अमरहिंद मंडळ, जय भारत, विजय क्लब, गुड मॉर्निंग स्पोर्ट्स उपांत्य फेरीत

  बालमित्र हनुमान क्रीडा मंडळ आयोजित पुरुष प्रथम श्रेणी जिल्हास्तरीय “आमदार चषक” कबड्डी स्पर्धा- २०२३.

मुंबई : अमरहिंद मंडळ, जय भारत, विजय क्लब, गुड मॉर्निंग स्पोर्ट्स यांनी बालमित्र हनुमान क्रीडा मंडळाने आयोजित, भारतीय जनता पार्टी पुरस्कृत पुरुष प्रथम श्रेणी जिल्हास्तरीय “आमदार चषक” कबड्डी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक दिली. प्रभादेवी येथील राजाभाऊ साळवी क्रीडानगरीत सुरू असलेल्या उपांत्यपूर्व सामन्यात अमरहिंदने गोलफादेवी सेवा मंडळाचा कडवा प्रतिकार ३४-३१असा मोडून काढत उपांत्य फेरी गाठली. सुरुवातीपासून आक्रमक सुरुवात करीत सामन्याची सूत्र आपल्या हाती ठेवणाऱ्या गोलफादेवीने शेवटच्या ४मिनिटात सामना आपल्या हातून गमावला. शेवटची ५मिनिटे पुकारली तेव्हा २६-२४अशी गोलफादेवीकडे आघाडी होती. पण शेवटच्या ४ मिनिटात अमरहिंदने गोलफादेवीवर लोण देत ३०-२७ अशी आघाडी घेतली व ती शेवटपर्यंत टिकवीत विजय साकारला. या चुतपुटत्या विजयाचे श्रेय निशांत देवळेकर, दीप थरळ यांच्या सावध चढाया व शुभम यादवच्या भक्कम बचावाला जाते. गोलफादेवीच्या धनंजय सरोज, विराज उतेकर, अनिकेत जावरे यांचा संयम शेवटच्या ४मिनिटात सुटल्यामुळे त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.
दुसऱ्या सामन्यात जय भारत सेवा मंडळाने एस.एस.जी. फौंडेशनला ४०-३९ असे चकवीत आगेकूच केली. निखिल पाटील, ओमकार मोरे यांच्या चढाई-पकडीचा उत्कृष्ट खेळ या विजयात महत्वपूर्ण ठरला. एस एस जी कडून पंकज मोहिते एकाकी लढला. विजय क्लबने अक्षय सोनी, राहुल शिरोडकर यांच्या चतुरस्त्र खेळाच्या बळावर विद्यासागर मंडळाला ३७-१३असे सहज नमविले. विद्यासागरचा प्रथमेश कमाने चमकला. शेवटच्या सामन्यात गुड मॉर्निंगने अंकुरचे आव्हान २८-२४ असे मोडून काढले. पूर्वार्धात १८-१२ अशी गुड मॉर्निंगकडे आघाडी होती. शार्दूल पाटील, साहिल राणे, अजय शिंदे गुड मॉर्निंगकडून, तर सुमित साइल, अभिमन्यू पाटील, राकेश भोसले अंकुरकडून उत्कृष्ट खेळले. 

 139 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.