शिवसेना पक्ष कार्यालयातून नागरिकांचे प्रश्न सोडविण्याचे काम होईल

ठाणे मनपातील शिवसेना पक्ष कार्यालयाचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते उद्घाटन

ठाणे 18 – शिवसेनेच्या पक्ष कार्यालयातून नागरिकांचे प्रश्न सोडवण्याचे काम होईल असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज महापालिकेतील शिवसेना गटनेते कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी व्यक्त केला.
ठाणे महानगरपालिकेतील शिवसेना गटनेते पवन कदम यांच्या कार्यालयाचे उद्घाटन आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी खासदार नरेश म्हस्के, प्रा. ज्योती वाघमारे, महापौर शर्मिला पिंपळोलकर, उपमहापौर कृष्णा पाटील, सभागृह नेते हणमंत जगदाळे, विरोधी पक्षनेते अशरफ शानू पठाण, शिवसेना ठाणे जिल्हा महिला आघाडी प्रमुख मिनाक्षी शिंदे, माजी उपमहापौर पल्लवी कदम,शिवसेना प्रवक्ते राहुल लोंढे यांच्यासह शिवसेनेचे सर्व नगरसेवक, शाखाप्रमुख, विभाग प्रमुख आदी उपस्थित होते.

ठाण्याने शिवसेनेला कायम साथ दिली असून ठाण्याच्या विकासासाठी शिवसेना कटिबद्ध आहे. ठाण्याने महाराष्ट्राला मुख्यमंत्री दिला असून शहरात मेट्रोसह विविध विकासकामे वेगाने सुरू आहेत. नागरिकांचे प्रश्न सोडविण्याचे काम या कार्यालयातून प्रभावीपणे होईल, असा विश्वास व्यक्त करत सर्व नगरसेवकांनी जनतेसाठी कार्यरत राहावे, असे आवाहन करण्यात आले.

ठाण्यात सर्वाधिक नगरसेवक शिवसेनेचे निवडून आल्याबद्दल ठाणेकर नागरिकांचे आभार श्री.शिंदे यांनी मानले. पक्षाचे संख्याबळ वाढल्यामुळे आनंदाचे वातावरण असून बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे यांची शिकवण पुढे नेण्याचे काम शिवसैनिक करत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

बाळासाहेब ठाकरे यांचे ठाण्यावर विशेष प्रेम होते आणि ठाण्याने शिवसेनेला मोठे करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली, हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले. तसेच नव्याने निवडून आलेल्या नगरसेवकांना जुन्या नगरसेवकांनी मार्गदर्शन करावे, असा सल्लाही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी अनुभवी नगरसेवकांना दिला.

उबाठा खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या भेटीचा कुणीही वेगळा अर्थ काढू नये

उबाठा गटाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी येऊन भेट घेतली. याबद्दल माध्यमांनी बातम्या चालवल्याने त्याबाबत उपमुख्यमंत्री शिंदे यांना विचारले असता, राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून विविध पक्षांचे लोकप्रतिनिधी त्यांच्या मतदारसंघातील कामांसाठी माझी भेट घेत असतात. त्यानुसार खासदार आष्टीकर यांनी आज माझी भेट घेतली होती, मात्र या भेटीचा कुणीही वेगळा अर्थ काढू नये अशी अपेक्षा शिंदे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली.

 6,483 total views,  210 views today