उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठाण्यातील लेग्रँडच्या कौशल्य विकास केंद्रांचे उद्घाटन
ठाणे, ता, 21 :
या प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून केवळ एका इमारतीचे उद्घाटन झाले नसून ठाणे आणि परिसरातील हजारो युवकांच्या स्वप्नांना नवे पंख मिळाले आहेत, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. “हे फक्त उद्घाटन नाही, तर युवकांच्या आकांक्षा आणि स्वप्नांना नवी दिशा देणाऱ्या प्रवासाची सुरुवात आहे,” असे सांगत त्यांनी कौशल्य विकास आणि रोजगारनिर्मितीच्या क्षेत्रातील या उपक्रमाचे कौतुक केले. ठाण्यातील ‘लेग्रँड इन्स्टिट्यूट फॉर ट्रेनिंग अँड एज्युकेशन’ या अत्याधुनिक प्रशिक्षण केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
कार्यक्रमाला कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नवोन्मेष मंत्री मंगल प्रभात लोढा, मुंबईतील फ्रान्सच्या उप-वाणिज्यदूत ॲग्नेस सिल्वा, ग्रुप लेग्रँड इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापकीय संचालक टोनी बर्लँड, सीएसआर व सस्टेनेबिलिटी विभागाच्या उपाध्यक्षा आबिदा अनिझ, स्किलसॉनिक्सचे सीईओ प्रसन्नजीत कुंडू, ज्येष्ठ नगरसेवक एकनाथ भोईर, नगरसेवक योगेश जानकर यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (सीएसआर) उपक्रमांतर्गत सुरू करण्यात आलेल्या या संस्थेमुळे स्थानिक युवकांना मोफत प्रशिक्षणासह रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. उद्योगांच्या गरजेनुसार कुशल मनुष्यबळ तयार करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य या केंद्रातून केले जाणार असून यासाठी त्यांनी लेग्रँड समूहाचे विशेष अभिनंदन केले.
“आज विविध उद्योगांना प्रशिक्षित आणि कौशल्यपूर्ण मनुष्यबळाची गरज आहे. अशा वेळी युवकांना आधुनिक तांत्रिक प्रशिक्षण देऊन रोजगारक्षम बनविण्याचे काम लेग्रँड इन्स्टिट्यूट करणार आहे. त्यामुळे युवकांच्या आयुष्याला नवी दिशा मिळेल,” असे ते म्हणाले.
ठाण्याच्या बदलत्या औद्योगिक चित्राचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले की, एकेकाळी आशियातील अग्रगण्य औद्योगिक केंद्र असलेली वागळे इंडस्ट्रियल इस्टेट आता आयटी, डेटा सेंटर आणि सेवा उद्योगांचे महत्त्वाचे केंद्र बनत आहे. त्यामुळे रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होत असून प्रशिक्षित युवकांना त्याचा मोठा फायदा होणार आहे.
रिअल इस्टेट क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचे नमूद करताना शिंदे म्हणाले की, बांधकाम आणि पायाभूत सुविधा क्षेत्रात इलेक्ट्रिशियन आणि तांत्रिक मनुष्यबळाची मोठी मागणी आहे. येथे प्रशिक्षण घेणाऱ्या युवकांसाठी रोजगाराच्या असंख्य संधी उपलब्ध होणार आहेत.
शेतीनंतर सर्वाधिक रोजगार निर्माण करणारे क्षेत्र म्हणजे रिअल इस्टेट असून या क्षेत्राला राज्य सरकारने विविध धोरणात्मक निर्णयांद्वारे बळ दिले आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्रात वाढणाऱ्या गुंतवणुकीचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले की, राज्य आज उद्योगांसाठी सर्वाधिक अनुकूल ठिकाण म्हणून उदयास आले आहे. मोठ्या प्रमाणावर परदेशी गुंतवणूक राज्यात येत असून डेटा सेंटर, आयटी आणि उत्पादन क्षेत्रात नवनवीन प्रकल्प उभे राहत आहेत. उत्कृष्ट पायाभूत सुविधा, कनेक्टिव्हिटी आणि प्रशिक्षित मनुष्यबळामुळे जगभरातील कंपन्या महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यास उत्सुक आहेत, असे ते म्हणाले.








गडचिरोलीतील कौशल्य विकास उपक्रमांचा दाखला देताना शिंदे यांनी सांगितले की, प्रशिक्षण आणि रोजगाराच्या संधींमुळे अनेक युवकांचे आयुष्य बदलले आहे. कौशल्य विकास हीच देशाच्या प्रगतीची खरी गुरुकिल्ली असून अशा प्रशिक्षण संस्थांमुळे युवकांना आत्मनिर्भर बनण्याची संधी मिळते, असे त्यांनी नमूद केले.
नवीन प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन करताना त्यांनी आत्मविश्वास आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांचे महत्त्व अधोरेखित केले. “येथे तुम्हाला प्रशिक्षण आणि प्लेसमेंट दोन्ही मिळणार आहेत. त्यामुळे तुमच्या यशाचा भक्कम पाया तयार होईल. तुमचे भविष्य उज्ज्वल आहे. ध्येय पूर्ण होईपर्यंत थांबू नका,” असा संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
ग्रुप लेग्रँड इंडियाने नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (एनएसडीसी) मान्यताप्राप्त स्किलसॉनिक्सच्या सहकार्याने उभारलेले हे सुमारे ८,००० चौरस फुटांचे अत्याधुनिक प्रशिक्षण केंद्र आहे. आयटीआय, डिप्लोमा आणि अभियांत्रिकी विद्यार्थी तसेच इलेक्ट्रिशियन आणि तंत्रज्ञांना उद्योगाभिमुख प्रशिक्षण देण्यासाठी ते सुसज्ज करण्यात आले आहे. या केंद्रातून दरवर्षी एक हजारांहून अधिक युवक आणि इलेक्ट्रिशियनना मोफत प्रशिक्षण देऊन त्यांची रोजगारक्षमता वाढविण्यात येणार आहे.
यावेळी ग्रुप लेग्रँड इंडियाचे सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक टोनी बर्लँड यांनी कौशल्य विकासाद्वारे युवकांना सक्षम बनविण्याच्या कंपनीच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. आधुनिक तंत्रज्ञानाधारित प्रशिक्षणाद्वारे भविष्यातील उद्योगांसाठी सक्षम मनुष्यबळ तयार करणे हे या केंद्राचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.
8 total views, 8 views today