लक्ष्मीमाता कबड्डी संघाला पुरुष द्वितीय श्रेणीचे जेतेपद

   मुंबई शहर कबड्डी संघटना आयोजित पुरुष द्वितीय व तृतीय श्रेणी जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा- २०२२-२३.

 

 मुंबई : लक्ष्मीमाता कबड्डी संघ ठरला मुंबई शहर कबड्डी असोसिएशनने आयोजित केलेल्या पुरुष द्वितीय श्रेणी गटाचा विजेता संघ. तर गुरुमाऊली स्पोर्ट्स, महापुरुष माघी गणेश, नवनाथ मंडळ, शताब्दी स्पोर्ट्स यांनी पुरुष तृतीय श्रेणी गटात उपांत्यपूर्व फेरीत धडक दिली. वडाळा येथील भारतीय क्रीडा मंदिराच्या भव्य पटांगणावर सुरू असलेल्या या स्पर्धेतील पुरुष द्वितीय श्रेणी गटाच्या अंतिम सामन्यात लक्ष्मीमाताने समर्थ स्पोर्ट्सचा २८-२४ असा पराभव करीत अंतिम जेतेपद मिळविले. यंदाचे त्यांचे हे दुसरे विजेतेपद. कबड्डीतील शहेनशहा मधुसूदन पाटील यांनी एकेकाळी गाजविलेला हा संघ मध्यंतरी काहीं काळ गतस्मृतीत गेला होता. तो आता पुन्हा भरारी घेत आहे. अत्यंत सावधपणे खेळला गेलेल्या या सामन्यात पहिल्या डावात १८-१२अशी आघाडी लक्ष्मीमाताकडे होती. उत्तरार्धात आणखी सावध खेळ करीत लक्ष्मीमाताने आपल्या विजयावर शिक्कामोर्तब केले. सौरभ तुणतुणे, ओमकार मेस्त्री यांच्या चढाई-पकडीच्या खेळाला या विजयाचे श्रेय जाते. प्रभाकर झोरे, किरण ढेबे यांनी समर्थकडून  शेवटच्या क्षणापर्यंत शर्थीची लढत दिली, पण संघाला विजयी मिळवून देण्यात ते कमी पडले.
पुरुष तृतीय श्रेणीच्या उपउपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात गुरुमाऊली स्पोर्ट्सने #सुवर्ण चढाईत# श्री जाकादेवी मंडळाला ४७-४६ असे पराभूत करीत उपांत्यपूर्व फेरी गाठली. पहिल्या सत्रात १३-२० असे पिछाडीवर पडलेल्या गुरुमाऊलीने पूर्ण डावात जाकादेवीला ४१-४१ असे बरोबरीत रोखले. ५-५ चढायात देखील ४६-४६ अशी बरोबरी झाली. त्यामुळे “सुवर्ण चढाई” देण्यात आली. त्याकरिता पुन्हा नाणेफेक करण्यात आली. ती गुरुमाऊलीने जिंकली आणि चढाईत गडी टिपत आपला विजय साजरा केला. दिनेश धामणे, दीपक धामणे गुरुमाऊलीकडून, तर रोहित धनावडे, श्रेयस धावडे जाकादेवीकडून उत्तम खेळले. 
याच गटात महापुरुष माघी गणेशने मराठा मित्र मंडळाला ४३-२४ असे, नवनाथने ओम त्रिशूळला ३२-११ असे, तर शताब्दी स्पोर्ट्सने महेश मंडळाला २७-१९असे पराभूत करीत उपांत्यपूर्व फेरीत धडक दिली.

 297 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.