पय्याडेचा ग्लोरियस विजय

प्रकाश पुराणिक स्मृती चषक क्रिकेट
मुंबई : रिद्धी ठक्करच्या प्रभावी फिरकीपुढे ग्लोरियस क्रिकेट क्लबचा अवघा संघ ७० धावांत गारद झाला आणि पय्याडे स्पोर्टस् क्लबने विजयी लक्ष्य २ फलंदाजांच्या मोबदल्यात ६.४ षटकांतच गाठले आणि माहीम ज्युवेनाईल स्पोर्टस् क्लबच्या प्रकाश पुराणिक स्मृती चषक महिला टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली. तसेच राजावाडी, फोर्ट यंगस्टर्स आणि स्पोर्टस्फिल्ड यांनी अंतिम चार संघांत स्थान मिळविले. आता शुक्रवारी उपांत्य फेरीत पय्याडे विरुद्ध स्पोर्टस्फिल्ड तर फोर्ट यंगस्टर विरुद्ध राजावाडी अशा लढती रंगतील.
शिवाजी पार्कवर सुरू असलेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात पय्याडेच्या रिद्धी ठक्करच्या फिरकीसमोर ग्लोरियसचा डाव रंगूच शकला नाही. रिद्धीने आघाडीच्या तीन फलंदाजांना बाद करून ग्लोरियसचे कंबरडे मोडले. परिणामता त्यांचा डाव ७० धावांतच आटोपला. पय्याडेच्या खुशी भाटिया (२२) आणि सलोनी कुष्टे (ना. ३६) यांनी ६४ धावांची घणाघाती सलामी देत मोठ्या थाटात उपांत्य फेरी गाठली. रिद्धी पय्याडेच्या विजयाची शिल्पकार ठरली.
दुसर्‍या उपांत्यपूर्व लढतीत राजावाडी क्रिकेट क्लबने वृषाली भगतच्या ३७ चेंडूतील ६२ धावांच्या जोरावर ६ बाद १३४ अशी दमदार मजल मारली. प्रत्युत्तरादाखल गौड युनियन स्पोर्टस् क्लबचा संघ २० षटकांत ७ बाद ८४ धावांपर्यंतच पोहचू शकला. राजावाडीच्या सेजल राऊतने ७ धावांत ३ विकेट मिळविल्या. गौड युनियनकडून चेतना बिश्तने आणि निर्मिती राणे या दोघींनी प्रत्येकी २७ धावा केल्या. या सामन्याचा सर्वोत्तम खेळाडूचा मान वृषाली भगतला मिळाला.
अन्य उपांत्यपूर्व लढतीत फोर्ट यंगस्टर्स , विरारने पालघर-डहाणू तालुका स्पोर्टस असोसिएशनचा ७ विकेटनी पराभव केला. पालघर-डहाणू संघाने ८ बाद ९८ धावा केल्या तर फोर्ट यंगस्टर्सने मानसी पाटील (२६) आणि झिल डिमेलो (३९) यांच्या फलंदाजीच्या जोरावर २० चेंडू आणि ७ विकेटनी विजय नोंदविला. तसेच स्पोर्टस् फिल्डने दहिसर स्पोर्टस् क्लबचा ३९ धावानी पराभव करीत उपांत्य फेरीत स्थान मिळविले.

 129 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.