“सुवर्ण चढाईत” विजय क्लब ठरला “आमदार चषकाचा” विजेता

विजय क्लबचा अक्षय सोनी स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरला.

बालमित्र हनुमान क्रीडा मंडळ आयोजित पुरुष प्रथम श्रेणी जिल्हास्तरीय “आमदार चषक” कबड्डी स्पर्धा- २०२३.

 मुंबई : विजय क्लबने बालमित्र हनुमान मंडळाने आयोजित आणि भारतीय जनता पार्टी पुरस्कृत पुरुष प्रथम श्रेणी गटात “सुवर्ण चढाईत” विजेतेपद पटकाविले. विजय क्लबचा अक्षय सोनी स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरला. त्याला गिअरची सायकल देऊन गौरविण्यात आले. विजय क्लबने जय भारत सेवा मंडळाला ३३-३२ असे चकवीत रोख रु. वीस हजार(₹२०,०००/-) व “आमदार चषक” आपल्या नावे केला. उपविजेत्या जय भारताला चषक व रोख रु. पंधरा हजार (₹१५,०००/-)वर समाधान मानावे लागले.  सावध सुरुवात करीत सुरुवातीपासून आघाडी आपल्याकडे राखणाऱ्या विजयकडे पहिल्या सत्रात १७-१३ अशी आघाडी होती. दुसऱ्या सत्रात ती टिकविण्याच्या नादात संयमी खेळ करणाऱ्या विजय क्लबला जय भारतने पूर्ण डावात २७-२७ असे बरोबरीत रोखले. ५-५ चढायामध्ये देखील ३२-३२(५-५) अशी बरोबरी झाली. 
कबड्डीच्या नियमानुसार सामन्याच्या निकालाकरिता “सुवर्ण चढाई” देण्यात आली. त्याकरिता पुन्हा नाणेफेक करण्यात येऊन ती विजय क्लबने जिंकली. या सुवर्ण चढाईत विजयच्या अक्षय सोनीने गडी टिपत संघाला गुण आणि जेतेपद देखील मिळवून दिले. अक्षय सोनी, राज नाटेकर यांच्या झंजावाती चढाया, तसेच शुभम रहाटे, ओमकार येणपुरे यांनी केलेला भक्कम बचाव यामुळे विजय क्लबने हा निसटता विजय संपादन केला. निखिल पाटील, ओमकार मोरे, सौरभ कुमार यांनी अखेरच्या क्षणापर्यंत निकराची लढत दिली. पण शेवटच्या नाणेफेकीच्या निर्णयाने सामन्याचा निकाल विजय क्लबच्या बाजूने झुकला.
गुड मॉर्निंग स्पोर्ट्सचा शार्दूल पाटील स्पर्धेतील उत्कृष्ट चढाईचा, तर जय भारतचा ओमकार मोरे स्पर्धेतील उत्कृष्ट पकडीचा खेळाडू ठरला. त्या दोघांना प्रत्येकी सायकल देऊन सन्मानित करण्यात आले. या अगोदर झालेल्या उपांत्य फेरीत विजय क्लबने गुड मॉर्निंगला (३९-१२) असे, तर जय भारत सेवा मंडळाने अमरहिंद मंडळाला (३४-१७) असे पराभूत करीत अंतिम फेरीत धडक दिली होती. उपांत्य उपविजयी दोन्ही संघांना प्रत्येकी चषक व रोख रु. सात हजार(₹७,०००/-) देऊन सन्मानित करण्यात आले. या स्पर्धेचे बक्षीस वितरण आमदार आशिष शेलार, जितेंद्र राऊत यांच्या उपस्थितीत पार पडला.

 138 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.