महापुरुष माघी गणेश मंडळ ठरला ” बाबुराव शेटे स्मृतीचषकाचा” मानकरी

   मुंबई शहर कबड्डी संघटना आयोजित पुरुष द्वितीय व तृतीय श्रेणी जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा- २०२२-२३.

   मुंबई : मुंबई शहर कबड्डी संघटनेने आयोजित केलेल्या पुरुष तृतीय श्रेणी गटात महापुरुष माघी गणेश मंडळाने विजेतेपद मिळविले. वडाळा येथील भारतीय क्रीडा मंदिराच्या पटांगणावर संपन्न झालेल्या अंतिम सामन्यात महापुरुष माघी गणेश मंडळाने शिवतांडव प्रतिष्ठानचा प्रतिकार ३३-२० असा सहज मोडून काढत “स्व.बाबुराव शेटे स्मृती चषक” आपल्या नावे केला. मध्यांतराला १६-१२ अशी आघाडी घेणाऱ्या गणेश मंडळाने मध्यांतरानंतर आपला खेळ गतिमान करीत हा विजय सोपा केला. कुणाल शेलार, ओमकार गुरव यांच्या झंजावाती चढाया त्याला साहिल पवारची मिळालेली पकडीची भक्कम साथ यामुळे हा विजय शक्य झाला. शिवतांडवच्या प्रमोद घाग, महेश कोंडवलेकर, तेजस साळुंखे यांचा पूर्वार्धातील जोश उत्तरार्धात दुबळा पडला. त्यामुळे त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.
  या अगोदर झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात महापुरुष माघी गणेश मंडळाने शताब्दी स्पोर्ट्सचा- ४५-२७ असा, तर शिवतांडव प्रतिष्ठानने शिवनेरी स्पोर्ट्सचा ४७-३४ असा पराभव करीत अंतिम फेरी गाठली होती.

 289 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.