सूर्यकांत व्यायाम शाळा, दादोजी कोंडदेव स्पोर्ट्स, अमर संदेश स्पोर्ट्स, लक्ष्मीमाता कबड्डी संघाची आगेकूच

श्री साई क्रीडा मंडळ पुरुष द्वितीय श्रेणी जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा-२०२३.

मुंबई : सूर्यकांत व्यायाम शाळा, दादोजी कोंडदेव स्पोर्ट्स, अमर संदेश स्पोर्ट्स, लक्ष्मीमाता कबड्डी संघ यांनी श्री साई क्रीडा मंडळाने आयोजित केलेल्या द्वितीय श्रेणी गटात उपांत्यपूर्व फेरी गाठली. मफतलाल कंपाऊंड, लोअर परेल येथील स्वर्गीय गणेश गोताड क्रीडांगणावर झालेल्या दुसऱ्या फेरीच्या सामन्यात सूर्यकांत व्यायाम मंडळाने पंचगंगा मंडळाचे आव्हान २४-२१ असे संपुष्टात आणत आगेकूच केली. एकमेकांचा अंदाज घेत सावध खेळ करणाऱ्या सूर्यकांत कडे मध्यांतरापर्यंत ९-७ अशी आघाडी होती. अनिकेत परमार, मनीष आर्डे सूर्यकांतकडून, तर ओमकार देसाई, रवींद्र साळुंखे पंचगंगा संघाकडून उत्कृष्ट खेळले.
दादोजी कोंडदेव स्पोर्ट्सने अनिकेत जाधव, अमर कदम यांच्या चढाई-पकडीच्या जोरावर श्री साई स्पोर्ट्सला ३९-२० असे नमवित उपांत्यपूर्व फेरी गाठली. सागर लब्दे, निलेश पाटील श्री साईकडून उत्तम खेळले. अमर संदेशने जय भारत सेवाचा ४१-२१ असा पराभव केला तो अभिषेक पाल, अतिश जैसावाल, कल्पेश ठाकूर यांच्या चतुरस्त्र खेळामुळे. जय भारतचे रुशांत पाटील, ऋषिकेश मोरे चमकले. लक्ष्मीमाता कबड्डी संघाने श्री गणेश क्लबचा ३३-१८ पराभव केला. पार्थ गुरव, रोहित माळी, कल्पेश सातमकर लक्ष्मीमाताकडून, तर आदेश जांगळी श्री गणेश कडून उत्कृष्ट खेळले.

 134 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.