युवा फलटण, महिंद्रा, मध्य रेल्वे, युनियन बँक उपांत्य फेरीत दाखल

ओम् ज्ञानदीप क्रीडा मंडळ रौप्यमहोत्सवी “पुरुष व्यावसायिक गट राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा-२०२३”


मुंबई : युवा फलटण, महिंद्र, मध्य रेल्वे व युनियन बँक यांनी ओम् ज्ञानदीप मंडळाने आपल्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित केलेल्या #पुरुष व्यावसायिक गट# कबड्डी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक दिली. युवा फलटण विरुद्ध महिंद्रा आणि मध्य रेल्वे विरुद्ध युनियन बँक अशा उपांत्य लढती होतील. आदर्श नगरच्या वरळी स्पोर्ट्स क्लबच्या मैदानावरील “स्वर्गीय प्रभाकर(दादा) अमृते क्रीडानगरीतील मॅटवर झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या पहिल्या लढतीत मध्य रेल्वेने नाशिकच्या एच.ए.एल.चा ३७-२४ असा पराभव केला. दोन्ही डावात १-१ लोण देणाऱ्या रेल्वेकडे पहिल्या डावात १९-१३ अशी आघाडी होती. अजिंक्य पवार, रोहित पार्टे यांच्या दमदार चढाया व अमीर धुमाळचा भक्कम बचाव यामुळे रेल्वेने हा विजय मिळविला. नासिककरांनी सुरुवातीला उत्तम लढत दिली. दुसऱ्या डावात देखील दोन अव्वल पकड करीत विजयाच्या आशा निर्माण केल्या होत्या. पण अनुभवात कमी पडल्याने त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. जयेश पाटील, भूषण सानप, बॉबी सदाशिव एच.ए.एल. कडून उत्कृष्ट खेळले.
महिंद्राने मुंबईच्याच रुपाली ज्वेलर्सला ४६-३२ असे नमवित आगेकूच केली खरी, पण त्याकरिता त्यांना कडवी लढत द्यावी लागली. रुपाली ज्वेलर्सच्या सतपाल कुमावत, रसिक काळे, यश गायकवाड यांनी आक्रमक सुरुवात करीत ७व्या मिनिटाला महिंद्रावर लोण देत ११-०५अशी आघाडी घेत कबड्डी रसिकांना सुखद धक्का दिला. त्यातून सावरत महिंद्राने देखील आपले आक्रमण तेज केले. तेजस पाटील महिंद्राचा तारणहार बनला. त्याने आपल्या प्रत्येक चढाईत गुण घेत ज्वेलर्सवर लोण देत आणला. या घाई गडबडीत त्याची अव्वल पकड देखील झाली. त्यातून सावरत पुन्हा जोरदार आक्रमण करीत शिलकी दोन खेळाडू टिपत लोणची परतफेड केली आणि १७-१५ असे महिंद्राला आघाडीवर नेले. एवढ्यावरच न थांबता त्याने ताबोडतोब दुसरा लोण देत महिंद्राची आघाडी २८-१८ अशी वाढविली. शेवटी महिंद्राने १०गुणांनी सामना आपल्या नावे केला. तेजसला आकाश गायकवाडने चढाईत तर स्वप्नील शिंदेने पकडीत मोलाची साथ दिली. युनियन बँकेने १२-२२ असे १०गुणांच्या पिछाडीवरून मुंबई कस्टमचा प्रतिकार ३९-२९ असा मोडून काढत उपांत्य फेरीत धडक दिली. पहिल्या सत्रात २लोण देत कस्टमने ही आघाडी घेतली होती. पण पहिल्या डावात एक व दुसऱ्या डावात २ लोण देत बँकेने विजयाश्री खेचून आणली. भिकू, परेश हरड यांच्या झंजावाती चढाया त्यांना आदित्य शिंदे, ओमकार मोरे यांनी भक्कम पकडी करीत दिलेली साथ यामुळेच बँकेला विजय शक्य झाला. सुशांत साईल, अजिंक्य कापरे, प्रथमेश लघोट यांचा पहिल्या डावातील जोश दुसऱ्या डावात कोठेतरी हरविला. त्यामुळे त्यांना पराभव पत्करावा लागला.
शेवटच्या सामन्यात युवा फलटणने रायगडच्या मिडलाईन फौंडेशनचा ६२-४० असा पाडाव करीत उपांत्य फेरीत प्रवेश केला. पहिल्या सत्रात अत्यंत चुरशीने खेळला गेलेला हा सामना दुसऱ्या सत्रात मात्र एकतर्फी झाला. पहिल्या सत्रात २६-२४ अशी आघाडी घेणाऱ्या युवा फलटणने दुसऱ्या सत्रात टॉप गिअर टाकत जोशपूर्ण खेळ केला. आकाश शिंदे, मोहित गोयत यांच्या तुफानी चढाया आणि संकेत चव्हाण, असलम इनामदार यांचा भक्कम बचाव यामुळे आणखी ३लोण देत सामना एकतर्फी केला. नितीन धनकड, प्रफुल्ल झावरे, सुग्रीव पुरी, वैभव मोरे यांनी पहिल्या सत्रात कौतुकास्पद लढत दिली. दुसऱ्या सत्रात मात्र ते ढेपाळले. या अगोदर झालेल्या उपउपांत्यपूर्व सामन्यात मिडलाईनने एअर इंडियाला ४९-२७ असे, तर मुंबई कस्टमने बृहन्मुंबई महानगर पालिकेला ३८-२९ असे नमवित उपांत्यपूर्व फेरी गाठली होती.

 125 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.