क्षत्रिय मराठा कदम परिवाराचे पाचवे राज्यस्तरीय कुलसंमेलन नांदेडला होणार

कुलसंमेलनाच्या पहिल्या दिवशी ११ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी कुलदेवता श्रीतुळजाभवानीचा जागर गोंधळ तसेच मागील स्नेहसंमेलनाच्या छायाचित्रांचा स्लाईड शो तर दुसर्‍या दिवशी म्हणजेच १२ फेब्रुवारी रोजी सकाळी ग्रामदैवत दर्शन, त्यानंतर कदम कुळाचे ध्वजारोहण करण्यात येणार आहे.

ठाणे : महाराष्ट्रातील कदम घराण्याचे पाचवे भव्य राज्यस्तरीय कुलसंमेलन यावर्षी नांदेड जिल्ह्य़ातील धामदरी (अर्धापुर) जिजाऊ सृष्टी मैदान याठिकाणी ११ व १२ फेब्रुवारी या दिवशी आयोजित करण्यात आले आहे.
प्राचीन कदंब राजवंशाचा इतिहास समाजाला कळावा तसेच राज्यभरातील कदम कुटुंबियांना नोकरी व्यवसायात सहकार्य मिळावे , घराण्यातील नामवंतांचा सन्मान करणे ही उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवून , क्षत्रिय मराठा कदम परिवार या संस्थेने आजतागायत चार राज्यस्तरीय कुलसंमेलनांचे आयोजन केले आहेत. यातील तुळजापूर, गिरवी ( फलटण) , गढीताम्हाणे ( सिंधुदुर्ग) आणि गलांडवाडी ( दौंड ) याठिकाणी मोठ्या उत्साहात संपन्न झाली आहेत. यंदाचे पाचवे राज्यस्तरीय कुलसंमेलन मराठवाड्यातील नांदेडमध्ये ११ व १२ फेब्रुवारी रोजी होणार असून, महाराष्ट्रासह देशभरातून आणि परदेशातूनही मान्यवर संमेलनात उपस्थित राहणार आहेत.
व्यवसाय तसेच विविध कारणांमुळे विविध ठिकाणी वास्तव्यास असलेल्या कदम घराण्यातील व्यक्ति या कुल संमेलनानिमित्ताने एकत्र येणार असून , घराण्याचा जाज्वल्य वारसा जपण्याचा मानस या मेळाव्यातून केला जाणार आहे. या कुलसंमेलनाच्या पहिल्या दिवशी ११ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी कुलदेवता श्रीतुळजाभवानीचा जागर गोंधळ तसेच मागील स्नेहसंमेलनाच्या छायाचित्रांचा स्लाईड शो दाखवला जाणार आहे. तसेच दुसर्‍या दिवशी म्हणजेच १२ फेब्रुवारी रोजी सकाळी ग्रामदैवत दर्शन, त्यानंतर कदम कुळाचे ध्वजारोहण करण्यात येणार आहे. याप्रसंगी आखिल महाराष्ट्र इतिहास परिषदेचे अध्यक्ष प्रा. डाॅ.सतीश कदम , सुप्रसिद्ध लेखक जगदीश कदम , हिंगोली येथील समाजसेविका मीरा धनराज कदम , मोडीलिपी अभ्यासक सुनील कदम , डाॅ. शारदा कदम ( वसमत ) , डाॅ. सदानंद गावडे कदम ( चंदगड ) या मान्यवरांची व्याख्याने होणार आहेत. कुलसंमेलन कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री कमलकिशोर कदम आणि स्वागताध्यक्ष म्हणून नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीचे माजी जिल्हाध्यक्ष बी.आर.कदम यांची उपस्थिती राहणार आहे.
तरी या कदम घराण्याच्या राज्यस्तरीय कुलसंमेलनास सर्व कदम बंधूंनी उपस्थित राहण्याचे आवाहन क्षत्रिय मराठा कदम परिवार महाराष्ट्र राज्य अध्यक्ष अमरराजे कदम , सचिव रामजी कदम, मुख्य कार्यकारिणी सदस्य अमोल कदम, करंजवडे, ठाणे, मुरलीधर कदम धामदरीकर, नांदेड जिल्हाध्यक्ष सुधाकर कदम पाटील देळुबकर यांनी केले आहे.

 1,647 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.