पद्मश्री दया पवार प्रतिष्ठान आयोजित ‘चावडी’ शनिवारी उघडणार

ज्येष्ठ पत्रकार व लेखक प्रा. सुरेश द्वादशीवार आणि युवा अभ्यासक, लेखक डॉ. सूरज एंगडे यांची अनुक्रमे ‘अघोषित आणीबाणीच्या विळख्यात भारतीय लोकशाही’ आणि ‘समतावादी समाजाचा युटोपिया’ या विषयांवर चावडीत होणार व्याख्याने.

मुंबई : पद्मश्री दया पवार प्रतिष्ठानच्या वतीने ‘चावडी’ हा एक नवा सार्वजनिक मंच सुरू करण्यात येत असून त्याचे उद्घाटन २८ जानेवारी रोजी लोकशाहीर कडुबाई खरात यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याची घोषणा प्रतिष्ठानच्या कार्याध्यक्ष डॉ. प्रज्ञा दया पवार यांनी केली. यावेळी चावडीमध्ये दोन व्याख्याने, कवी-संमेलन तसेच शाहिरी गायन अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
ज्येष्ठ पत्रकार व लेखक प्रा. सुरेश द्वादशीवार आणि युवा अभ्यासक, लेखक डॉ. सूरज एंगडे यांची अनुक्रमे ‘अघोषित आणीबाणीच्या विळख्यात भारतीय लोकशाही’ आणि ‘समतावादी समाजाचा युटोपिया’ या विषयांवर व्याख्याने होणार आहेत.
ज्येष्ठ कवी, लेखक अर्जुन डांगळे यांच्या अध्यक्ष असलेल्या ‘पाणी कुठंवर आलं गं बाई’ हा दया पवारांच्या कवितांचा तसेच निमंत्रित कवींच्या कवितांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यात ज्येष्ठ कवी अशोक नायगावकर, नीरजा, अविनाश गायकवाड, गणेश कनाटे, छाया कोरेगावकर, दिशा पिंकी शेख, अक्षय शिंपी हे कवी-कवयित्री सहभागी होतील.
हा कार्यक्रम शनिवार, २८ जानेवारी रोजी सायं. ५ ते ९ या वेळेत दादर माटुंगा कल्चरल सेंटर, जे. के. सावंत मार्ग, माटुंगा पश्‍चिम येथे होणार आहे. नागरिकांनी या वैचारिक सांस्कृतिक जागरात सहभागी व्हावे असे आवाहन डॉ. प्रज्ञा दया पवार यांनी केले आहे.

 2,052 total views,  2 views today

Leave a Reply

Your email address will not be published.