बलाढ्य पश्चिम रेल्वे, मध्ये रेल्वे, नव महाराष्ट्र, महात्मा गांधीची विजयी सलामी

विद्यार्थी क्रीडा केंद्राची मोहन रावले स्मृती चषक राज्यस्तरीय खो- खो स्पर्धा

मुंबई :  परळच्या विद्यार्थी क्रीडा केंद्रातर्फे लाल मैदानात आयोजित केलेल्या निमंत्रित राज्यस्तरीय माजी खासदार मोहन रावले चषक खो-खो स्पर्धेत बलाढ्य पश्चिम रेल्वे, मध्य रेल्वे, नव महाराष्ट्र, शिर्सेकर महात्मा गांधी स्पोर्ट्स अकॅडमी ब संघांनी पुरुष गटात जोरदार विजयी सलामी दिली.
स्पर्धेतील पुरुष गटात सलामीच्या लढतीत मध्य रेल्वेने यजमान विद्यार्थी क्रीडा केंद्राचा १७-११ गुणांनी पराभव केला. विजयी संघाच्या मिलिंद चावरेकर, विजय हजारे, दिपेश मोरे यांनी शानदार अष्टपैलू खेळ केला. तसेच आदित्य येवारे, उत्तम सावंत यांनी देखील संरक्षणात चांगली चमक दाखवली. परभूत संघाच्या हर्ष कामतेकर, आयुश गुरव या दोघांची लढत एकाएकी ठरली.
अ गटातील दुसऱ्या सामन्यात पश्चिम रेल्वेने नाशिकच्या संस्कृती क्रीडा मंडळाचा ८ मिनिटे आणि १ गुण राखून आरामात पराभव केला. प्रसाद राडीये, महेश शिंदे, मनोज पवार या तिघांनी संरक्षणात चांगली चमक दाखवून आपल्या संघाचा विजय निश्चित केला. विश्रांतीलाच तीन गुणांची आघाडी पश्चिम रेल्वे संघाकडे होती. संस्कृती क्रीडा मंडळाच्या दिलीप खांडवी, गणेश राठोड यांनी विजयासाठी जोरदार प्रयत्न केले, पण ते अपुरेच ठरले.
क गटातील तिसऱ्या लढतीत पुण्याच्या नव महाराष्ट्र संघासमोर सोलापूरच्या उत्कर्ष क्रीडा मंडळाची मात्रा फारशी चालली नाही.  विश्रांतीलाच ७ गुणांची मोठी आघाडी घेऊन नव महाराष्ट्र संघाने आपला विजय निश्चित केला. अष्टपैलू खेळाडू करणारे मिलिंद कुरपे, वृषभ वाघ, संकेत सुपेकर त्यांच्या विजयाचे शिल्पकार ठरले. राहुल मंडलने सुरेख आक्रमणात ४ गडी टिपले. उत्कर्ष तर्फे जफर शेख, निखिल कापूरे यांनी संरक्षणात चमक दाखवली. विनित दिनकरने नव महाराष्ट्रच्या ५ खेळाडूंना बाद करण्यात यश मिळवले.
आणखी एका सामन्यात मुंबई उपनगरच्या शिर्सेकर महात्मा गांधी स्पोर्ट्स अकॅडमी ब संघाने उस्मानाबादच्या छत्रपती व्यायाम प्रसारक मंडळाचा ६ गुणांनी सहज पराभव केला. अनिकेत पोटे, ओमकार सोनावणे, निहार दुबळे यांनी खेळाच्या संरक्षण आणि आक्रमण या दोन्ही अंगात शानदार खेळ करून महात्मा गांधीला विजय मिळवून देण्यात मोठी भूमिका बजावली. पराभूत संघातर्फे विलास वळवी, विजय शिंदे, रमेश वसावे यांनी विजयासाठी जोरदार प्रयत्न केले.
शिवसेना युवा नेते आणि राज्याचे माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते स्पर्धेचा शानदार उद् घाटन समारंभ संपन्न झाला. यावेळी खासदार अरविंद सावंत, आमदार अजय चौधरी, माजी आमदार दगडू दादा सकपाळ, भारतीय महिला क्रिकेट संघाच्या माजी कर्णधार पद्मश्री डायना एडुलजी देखील उपस्थित होत्या. स्पर्धेला आमदार सुनील शिंदे, शाखा प्रमुख किरण तावडे यांनी देखील सदिच्छा भेट दिली.

 123 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.