निरंजन डावखरे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांकडे तक्रारअर्ज
ठाणे : तरुणींना नोकरीसाठी डांबून ठेवणाऱ्या वादग्रस्त सुपरवासी फाऊंडेशन संस्थेविरोधात येऊरमधील आदिवासींनीही वर्तकनगर पोलिसांकडे आज तक्रारअर्ज दाखल केला. भाजपाचे आमदार व जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे यांच्या उपस्थितीत आदिवासींच्या शिष्टमंडळाने पोलिसांकडे आपली व्यथा मांडली. त्यानंतर या प्रकरणी चौकशीनंतर कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन सहायक पोलिस आयुक्त पंकज शिरसाट यांनी दिले आहे.
येऊरमध्ये २०१७ पासून सुपरवासी फाऊंडेशन सुरू आहे. या संस्थेने आदिवासी नागरिकांना कमी दरात व्हेंटिलेटर व रोजगार देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, कालांतराने आदिवासींची वहिवाट बंद करण्यात आली. जंगलात जाण्यापासून आदिवासींना रोखले जाते. तर अवैध वृक्षतोडही केली जात आहे. तर आदिवासींवर खोटे गुन्हे दाखल करुन दहशत निर्माण करण्याबरोबरच जेलमध्ये टाकण्याची धमकी देण्यात येते. या संस्थेकडून आजूबाजूची जमीन बळकाविण्याचा प्रयत्न केला जात आहे. आदिवासींसाठी कार्य करीत असल्याचा संस्थेकडून भास निर्माण केला जात आहे. व्हेंटिलेटर बनविण्याचा दावा केला जात असला, तरी कोरोनाच्या आपत्तीत आदिवासींसाठी एकही व्हेंटिलेटर दिला गेला नाही, याकडे आदिवासींनी आपल्या तक्रारअर्जात पोलिसांचे लक्ष वेधले आहे. संबंधित संस्थेत आदिवासी संस्कृती आणि हिंदू संस्कृती हीन समजण्याबरोबरच हिंदू देव-देवतांचा अपमान, पूजन करण्यापासून रोखणे, संस्थेत काम करणाऱ्या मुलींना कुटूंबापासून तोडणे आदी प्रकार केला जात असल्याचा आरोपही आदिवासींनी निवेदनाद्वारे केला आहे. भाजपाचे जिल्हाध्यक्ष व आमदार निरंजन डावखरे यांच्या उपस्थितीत आदिवासींच्या शिष्टमंडळाने सहायक पोलिस आयुक्त पंकज शिरसाट यांना तक्रारअर्ज देऊन सुपरवासी फाऊंडेशनविरोधात कारवाई करण्याची विनंती केली. या वेळी नगरसेविका मृणाल पेंडसे, स्नेहा आंब्रे, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस विलास साठे, रोहित जोशी, अश्विन शेट्टी, सचिन मोरे, स्थानिक नागरिक किशोर म्हात्रे आदी उपस्थित होते.
516 total views, 1 views today