त्या रुग्णाला मनसेच्या प्रयत्नामुळे तब्बल ७ तासांनी मिळाली ऑक्सिजन रुग्णवाहिका

नवी मुंबई मनपा प्रशासनाचा भोंगळ कारभार

नवी मुंबई : मनसेच्या प्रयत्नामुळे प्रकृती खालावलेल्या कोरोनाबाधित महिला रुग्णाला शनिवार, १३ सप्टेंबर रोजी तब्बल ७ तासानंतर ऑक्सिजन रुग्णवाहिका मिळाल्यामुळे नवी मुंबई मनपा प्रशासनाचा भोंगळ कारभार यानिमित्ताने पुन्हा एकदा समोर आला आहे. सानपाडा – पामबीच येथील कोरोनाबाधित महिला रुग्ण गेल्या ४ दिवसांपासून नवी मुंबई मनपाच्या निर्यात भवन, तुर्भे सेक्टर १९, कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेत होत्या. मात्र काल रात्रीपासून त्यांना श्वसनाचा त्रास होऊ लागला. त्यानंतर त्यांची प्रकृती अधिक खालावली. त्यामुळे येथील कोविड केअर सेंटर मधील डॉक्टरांनी सदर कोविड केअर सेंटर मध्ये ऑक्सिजन पाईपलाईन नसल्याने त्यांना वाशी येथील मनपाच्या सिडको कोविड सेंटर मध्ये शिफ्ट करण्याचा सल्ला त्यांच्या नातेवाईकांना दिला. मात्र या महिला रुग्णाला आज सकाळी ९ वाजल्यापासून ऑक्सिजन रुग्णवाहिका उपलब्ध होत नसल्याने त्यांच्या नातेवाईकांनी मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्यानंतर मनसेचे शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्यासोबत मनसेचे शहर सचिव विलास घोणे, सहसचिव अमोल इंगोले, विभाग अध्यक्ष योगेश शेटे, अभिलेष दंडवते, अशोक भोसले शारीरिक सेनेचे शहर संघटक सागर नाईकरे, रोजगार – स्वयं रोजगार विभागाचे शहर संघटक सनप्रित तुर्मेकर, उपशहर संघटक अनिकेत पाटील, मनविसे शाखा अध्यक्ष प्रदीप संकपाळ, संतोष कुमार खांडगेपाटील यांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेतली. त्यानंतर मनसेचे शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी फोन वर चर्चा करून त्या महिला रुग्णाला ऑक्सिजन रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली. मनसेच्या प्रयत्नामुळे त्या महिला रुग्णाला तब्बल ७ तासानंतर ऑक्सिजन रुग्णवाहिका मिळाल्याने रुग्णांच्या नातेवाईकांनी मनसेचे विशेष आभार मानून समाधान व्यक्त केले. मात्र अजूनही कोरोनाबाधित रुग्णांना रुग्णवाहिकेसाठी मोठा संघर्ष करावा लागत असल्याने मनपा प्रशासनाच्या गलथान कारभाराचा मनसेचे शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी तीव्र निषेध व्यक्त केला. लोकांचे जीव आता स्वस्त झाले आहेत का ? असा सवाल उपस्थित करत यामध्ये सुसूत्रता आणण्यासाठी तसेच सदर प्रकरणाची चौकशी करण्यासाठी लवकर मनपा आयुक्त अभिजित बांगर यांची भेट घेणार असल्याचे शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी सांगितले.

 353 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.