नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्ताने भाजपाचा उद्यापासून सेवा सप्ताह

सेवा सप्ताहानिमित्ताने भाजपा राबवणार अनेक सेवाभावी उपक्रम

ठाणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्ताने भाजपातर्फे उद्या सोमवारी १४ सप्टेंबरपासून २० सप्टेंबरपर्यंत सेवा सप्ताह पाळण्यात येणार आहे. त्याचबरोबर पंडित दीनदयाळ उपाध्याय जयंतीनिमित्ताने २५ सप्टेंबर रोजी भाजपाच्या कार्यकर्त्यांकडून आपल्या निवासस्थानावर पक्षध्वज फडकविला जाईल. तर महात्मा गांधी जयंतीनिमित्ताने संपूर्ण ठाणे शहरात स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे, अशी माहिती भाजपाचे जिल्हाध्यक्ष व आमदार निरंजन डावखरे यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.
सेवा सप्ताहानिमित्ताने भाजपातर्फे अनेक सेवाभावी उपक्रम राबविले जाणार आहेत. त्यात शहरातील दिव्यांगांना ७० कृत्रिम अवयव व उपकरणे प्रदान करण्यात येतील. शहरातील सुमारे १५ हून अधिक कोविड रुग्णालये व कामगार रुग्णालयात फळवाटप, प्लाझ्मा दान करण्याची इच्छा असलेल्या नागरिकांची यादी केली जाणार असून, गरजेनुसार त्याचा वापर केला जाईल, शहरातील उजाड झालेल्या काही बागा पुनरुज्जिवीत करण्यासाठी महापालिकेकडे पाठपुरावा, शहरात फॉरेस्ट हब जाहीर झालेल्या ठिकाणी वृक्षारोपण, पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने शहरातील प्लास्टिक जमा करून रिसायकलिंगसाठी समर्थ भारत व्यासपीठकडे, शहरात वेबिनारच्या माध्यमातून व्हर्च्युअल कॉन्फरन्स, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७० स्लाईडचे प्रदर्शन आदी कार्यक्रम केले जाणार आहे, असे आमदार निरंजन डावखरे यांनी सांगितले. आमदार संजय केळकर यांच्या माध्यमातून ७० गरजू विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणासाठी नेट पॅक दिले जाणार आहेत. त्याचबरोबर शहरातील ११ मंडलांमध्ये गरजू नागरिकांच्या डोळ्यांची तपासणी केली जाणार असून, ७० गरजूंना चष्मे दिले जाणार आहेत.
पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्ताने शहरातील ३३ पॅनलमध्ये दिनदयाळजींच्या प्रतिमेचे पूजन केले जाईल. त्यानंतर पक्षाच्या नेत्यांबरोबरच सर्व कार्यकर्ते आपल्या निवासस्थानी पक्षाचा ध्वज फडकविणार आहेत. या दिवशी भाजपाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व खासदार विनय सहस्रबुद्धे यांच्याकडून पंडित दीनदयाळजींच्या जीवनचरित्राविषयी प्रबोधनाचा कार्यक्रम होईल.
महात्मा गांधी जयंतीच्या निमित्ताने ठाणे शहरात स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आत्मनिर्भर भारताचा संकल्प विविध प्रकारच्या संवादाच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोचविण्यात येणार आहे. नरेंद्र मोदी सरकारने जाहीर केलेल्या २० लाख कोटी रुपयांच्या आत्मनिर्भर भारत पॅकेजच्या विविध योजनांचा बूथस्तरापर्यंत प्रचार व प्रसार करण्यात येईल, अशी माहिती आमदार निरंजन डावखरे यांनी दिली.

 558 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.