वीजबिल कमी करण्यासाठी शिवसेनेची महावितरण कार्यालयावर धडक

कल्याण पूर्वेत तक्रार निवारण केंद्र ,  वीज मीटरची रिडींग ३० दिवसांच्या आत घ्या, वाढीव बिले कमी करून देण्याची केली मागणी

कल्याण : लॉकडाऊन काळात महावितरणने भरमसाठ वीज बिले पाठवून नागरिकांना चांगलाच शॉक दिला. वीज बिल कमी करण्याची मागणी सर्वच राजकीय पक्षांकडुन करण्यात येत असली तरी अद्याप या मागणीबाबत निर्णय झालेला नाही. आज कल्याण शीळ रोड टाटा पावर येथील महावितरण कार्यालयावर शिवसेना कल्याण पूर्व संपर्क प्रमुख शरद पाटील यांच्या नेत्तृत्वाखाली शिवसेनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी धडक देत महावितरणच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला. कल्याण पूर्वेत तक्रार निवारण केंद्र उभारा,  वीज मीटरची रिडींग ३० दिवसांच्या आत घ्या, वाढीव बिले कमी करून घ्या अशी मागणी केली.
सर्वसामान्य नागरिकांना कोरोना लॉकडाऊनमुळे खायला अन्न नाही अशात १५ – २० हजार लाईट बिल येत आहेत. लॉकडाऊनच्या ५ महिन्यांच्या काळात एकत्र बिल पाठवल्याने युनिट रेट वाढला असून तो कमी करावा, कल्याण पूर्वेत मोठी लोकसंख्या असतांना देखील महावितरण संदर्भात तक्रार करण्यासाठी टाटा पॉवर येथील कार्यालयात जावे लागते. यावर तोडगा म्हणून कल्याण पूर्वेतील विभागीय कार्यालयात तक्रार निवारणाची सुविधा उपलब्ध करण्यात आली असून सोमवार पासून हि सुविधा उपलब्ध होणार आहे. तसेच मीटर रीडिंग ३० दिवसांच्या आत घेण्याचे देखील आश्वासन महावितरणच्या वतीने देण्यात आले. राज्यात सरकार जरी शिवसेनेचे असले तरी सर्वसामन्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी महावितरण कार्यालयावर धडक दिली असल्याची माहिती माजी नगरसेवक तथा शिवसेना उपशहर प्रमुख शरद पाटील यांनी दिली.
तर नागरिकांचे वीजबिल कमी होत नाही, बिलामधील तफावत कमी होत नाही तोपर्यत कोणत्याही नागरिकाचे वीज मीटर काढण्यात येऊ नये अशी मागणी देखील  महावितरणला केली असून आमदारांचे वीजबिल त्वरित कमी होते मग सर्वसामान्य नागरिकांचे का नाही असा सवाल नगरसेवक महेश गायकवाड यांनी यावेळी उपस्थित केला.
यावेळी या आंदोलनात कल्याण पूर्व शिवसेना संपर्क प्रमुख शरद पाटील, परिवहन समिती सभापती मनोज चौधरी, नगरसेवक महेश गायकवाड, निलेश शिंदे, पुरुषोत्तम चव्हाण, माजी नगरसेवक हर्षवर्धन पालांडे, महादेव रायभोळे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, महिला आघाडी, युवा सेना, शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.        

 329 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.