२५ वर्षे सत्ता भोगूनही शिवसेना ठाणेकरांशी कृतघ्नच

मालमत्ता कर सवलत नाकारल्यावरून नगरसेविका मृणाल पेंडसें यांचा सेनेवर घणघणात

ठाणे : ठाणे महापालिकेची स्थापना झाल्यापासून सुरुवातीच्या तीन वर्षांचा अपवाद वगळता ठाण्यात शिवसेनेची सत्ता आहे. सुमारे २५ वर्ष ठाण्याची सत्ता उपभोगणाऱ्या सेनेने कोरोनासारख्या महामारीच्या गंभीर कालखंडात  आर्थिक अडचणीत असलेल्या ठाणेकरांना मालमत्ता कर व पाणीपट्टीतून सवलत देण्यास नकार देऊन ठाणेकरांशी कृतघ्नपणा केला आहे, अशी घनघणाती टीका भाजपाच्या नगरसेविका मृणाल पेंडसे यांनी पत्रकाद्वारे केली आहे. त्याचवेळी कर्नाटकमध्ये भाजपा सरकारने रिक्षाचालक-टॅक्सीचालकांना ५ हजारांची मदत दिली. त्यावरून महापौर नरेश म्हस्के हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कर्नाटकचे उदाहरण दाखविणार का, असे आव्हानही  मृणाल पेंडसे यांनी सेनेच्या पदाधिकाऱ्यांना दिले आहे.
कोरोनाच्या आपत्तीतच रोजगार व व्यवसाय हिरावल्यामुळे २५ लाख ठाणेकर आर्थिक अडचणीत आहेत. या पार्श्वभूमीवर मालमत्ता कर व पाणीपट्टीत दिलासा देण्याची नागरिकांच्या हिताची मागणी भाजपाकडून केली जात आहे. त्यावर निर्णय घेण्याऐवजी महापौर नरेश म्हस्के यांनी मागणीबाबत टाळाटाळ करीत, भाजपा नगरसेवकांना इन्कम टॅक्स माफ केला का, भाजपाच्या ताब्यातील पुणे, नागपूर महापालिकेने मालमत्ता कर माफ केला का, असा सवाल केला होता. ठाणेकरांच्या हिताच्या दृष्टीने संबंधित प्रश्न निरर्थक आहे. या प्रश्नांवरून आपण ठाणेकरांची जबाबदारी झटकून टाकू शकत नाहीत, असे म्हणत नगरसेविका मृणाल पेंडसे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
ठाणे महापालिकेची सत्ता शिवसेनेने २५ वर्षे उपभोगली. सध्याच्या मालमत्ता करात प्रचंड वाढीचा विषयही शिवसेनेने पाशवी बहूमताच्या जोरावर महासभेत मंजूर केला होता. त्यावेळी `ठाण्याची शिवसेना, शिवसेनेचे ठाणे’ कुठे होते. मात्र, आता ठाणेकरांना मालमत्ता करातून सवलत देण्याबाबतची टोलवाटोलवी  यांना शोभणारी नाही. महापालिकेच्या निवडणुकीत ५०० चौरस फूटांपर्यंत घरावरील मालमत्ता कर माफ करण्याचे शिवसेनेचे आश्वासनही हवेत विरले आहे. मात्र, त्यावर महापौर नरेश म्हस्के काहीही बोलत नाही, ही बाब संतापजनक आहे. .
कोरोनामुळे उत्पन्न घटल्यामुळे ठाणे शहराचा विकास ठप्प झाला आहे. कंत्राटदारांना केवळ २५ टक्के बिले दिली जात असल्याने, कोणीही काम करण्यास तयार नाही. बहूसंख्य कामे अर्धवट पडली आहेत.  कोरोनाच्या नावाखाली अवाढव्य रक्कमेची बिले मंजूर करण्यात आली. त्याला पायबंद कोण घालणार? ठाणेकरांच्या विकासासाठी असलेला कोट्यवधींचा निधी बिल्डरांची संघटना ओरबाडत आहे. गरीबांच्या मुखातील अन्न मर्जीतील कुटूंबाना दिले गेले.
केवळ चौकशीचे पत्र दिल्यानंतर महापौरांची जबाबदारी संपली होती का, कि त्यांच्यावर वरिष्ठांचा दबाव आला होता. महापौरांनी आतापर्यंत दिलेल्या चौकशीच्या पत्रांमध्ये प्रशासनाने काय केले, याची माहितीही ठाणेकरांना द्यावी, अशी टीका मृणाल पेंडसे यांनी केले.
कर्नाटकातील भाजपा सरकारने रिक्षाचालक-टॅक्सीचालकांच्या खात्यात ५ हजार रुपये जमा केले. पण महाराष्ट्रातील ठाकरे सरकारने एक छदामही दिला नाही. भाजपाच्या महापालिकांची उदाहरणे देणारे महापौर नरेश म्हस्के हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कर्नाटकचे उदाहरण  दाखविणार का, असा सवालही पेंडसे यांनी केला आहे.

मालमत्ता कर सवलत देणार नसल्याचे महापौरांनी जाहीर करावे : पेंडसे
गोंधळात झालेल्या वेब महासभेत मालमत्ता कर व पाणीपट्टी सवलतीबाबत महापौर नरेश म्हस्के यांनी टोलवाटोलवी केली. पण आता त्यांनी मालमत्ता कर सवलत देणार नाही, हे ठाणेकरांपुढे जाहीर करावे, असे आव्हान नगरसेविका मृणाल पेंडसे यांनी दिले आहे. भाजपाच्या महापालिका सवलत देत नाहीत, म्हणून आम्ही देणार नाही, अशी भूमिका हा शिवसेनेचा ठाणेकरांशी कृतघ्नपणा आहे.  नको त्या मुद्द्यांवर राजकारण करण्यापेक्षा शिवसेनेने ठाणेकरांच्या व्यथा समजून घेण्याची कृपा करावी, अशी विनंतीही पेंडसे यांनी केली आहे.

 435 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.