येऊरमध्ये नोकरीसाठी डांबून ठेवलेल्या ९ इंजिनिअर तरुणींची सुटका


भाजपाच्या कार्यकर्त्यांची कामगिरी
ठाणे : कोरोनासंदर्भात संशोधन व व्हेंटिलेटर तयार करण्याच्या आमिषाने एका एनजीओने येऊरमध्ये डांबून ठेवलेल्या ९ इंजिनिअर तरुणींची सुटका करण्यात आली आहे. गेल्या १० दिवसांपासून तरुणींना मानसिक त्रास देण्याबरोबरच कुटूंबांपासून संपर्क तोडण्यात आला होता. या प्रकाराबाबत आमदार निरंजन डावखरे यांच्याकडे तक्रार आल्यानंतर भाजपा कार्यकर्त्यांनी तातडीने तरुणींची मुक्तता केली. या प्रकरणी वर्तकनगर पोलिस अधिक तपास करीत आहेत.
येऊर येथील सुपरवासी फाऊंडेशनने ऑनलाईन जॉब पोर्टलच्या माध्यमातून परराज्यातील इंजिनिअर तरुणींची नियुक्ती केली होती. त्यांना दरमहा १० ते २० हजार रुपयांचे पगाराचे आमिष दाखविले. तसेच दर तीन महिन्याने १० हजारांच्या वेतनवाढीसह ९ महिन्यांपर्यंत ६ लाखांचे पॅकेज देणार असल्याचे नियुक्तीपत्र देण्यात आले होते. त्यानुसार ९ तरुणी २८ ऑगस्ट रोजी दाखल झाल्या. मात्र, त्यांचा तेथे मानसिक छळ सुरू झाला. त्यांना फोन वापरण्यास बंदी करण्याबरोबरच इतरांबरोबर बोलण्यासही मनाई करण्यात आली. त्यांच्या बेडरुममध्ये सीसीटीव्ही बसविण्यात आले होते. दर १५ मिनिटाने सायरन वाजल्यानंतर त्यांना मेडिटेशन करण्याची सक्ती केली जात होती. तुम्हाला गॉड बनवित असल्याचे सातत्याने सांगितले जात होते. त्याला नकार देणाऱ्या तरुणींना दमदाटी केली जात होती. त्याचबरोबर कुटूंबियांबरोबर संपर्कास मज्जाव केला जात होता. मात्र, केरळातील इडूक्की जिल्ह्यातील एका तरुणीने कंपनीतील सुपरवायझरच्या नकळत वडिलांशी संपर्क साधून ही माहिती कळविली. त्यावेळी तिच्या वडिलांनाही तुरुंगात टाकण्याची धमकी दिली गेली.
या गंभीर प्रकरणाची माहिती संबंधित तरुणीच्या वडिलांनी मुंबईतील मित्राला कळविली. त्यानंतर त्याने भाजपाचे आमदार व जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे यांच्या कानावर हा प्रकार घातला. त्यानंतर भाजपाच्या कार्यकर्त्यांनी तातडीने येऊरच्या पाटोणपाडा येथील सुपरवासी फाऊंडेशनमध्ये जाऊन ९ तरुणींची सुटका केली. या कंपनीत २ परदेशी तरुणीही आढळल्या. मात्र, त्यांनी तेथून बाहेर पडण्यास नकार दिला. भाजपाच्या कार्यकर्त्यांनी सर्व तरुणींना वर्तकनगर पोलिस ठाण्यात आणले. संबंधित तरुणींच्या पालकांशी संपर्क साधला जात असून, त्यांना उद्या घरी पाठविण्यात येणार आहे.
भाजपाच्या नगरसेविका मृणाल पेंडसे, सरचिटणीस विलास साठ्ये, रमेश आंब्रे, सचिन बी. मोरे यांच्याबरोबरच अश्विन शेट्टी, प्रशांत मोरे, राजेश बोराडे, अक्षय शिंदे, राजेश सावंत, जस्टीत राज, सुषमा ठाकूर, नयना भोईर, तृप्ती पाटील, तनुश्री जोशी, विद्या शिंदे, स्वप्नाली साळवी, संहिता देव, आलोक ओक, सागर कदम आदी कार्यकर्त्यांनी मुलींची यशस्वीपणे सुटका केली.

 666 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.