संत नामदेव महाराजांची जयंती राज्यस्तरावर साजरी करण्याबाबत राज्य सरकारची पावले

आमदार निरंजन डावखरे यांची मुख्यमंत्र्यांकडे विनंती

ठाणे, दि. २१ (प्रतिनिधी) : देशभर अभंग व किर्तनाच्या माध्यमातून अध्यात्म प्रसाराबरोबरच जनजागृती करणारे राष्ट्रसंत श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांची जयंती राज्य स्तरावरून शासनाने साजरी करण्याबाबत भाजपाचे आमदार निरंजन डावखरे यांच्यासह विविध संघटनांकडून करण्यात आलेल्या विनंतीच्या पार्श्वभूमीवर नियमांची तपासणी करून अहवाल सादर करावा, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रधान सचिवांना दिले आहेत.
अखिल भारतीय श्री क्षत्रिय अहिर शिंपी समाज, मध्यवर्ती संस्था यांच्यासह शिंपी समाजातील काही संघटनांनी संत नामदेव महाराजांची जयंती राज्यस्तरावर साजरी करावी, अशी विनंती आमदार निरंजन डावखरे यांच्याकडे केली होती. नागपूर येथील विधीमंडळ अधिवेशनावेळी आमदार निरंजन डावखरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे विनंती केली होती. त्यावर या प्रकरणी नियमांची तपासणी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिल्यामुळे, राज्य सरकारने संत नामदेव महाराजांची जयंती राज्यस्तरावर साजरी करण्यासंदर्भात एक पाऊल पुढे टाकल्याचे मानले जात आहे.
दरम्यान, वारकरी सांप्रदायातील थोर संत अशी श्री संत शिरोमणी नामदेव महाराजांची ओळख आहे. ते शिंपी समाजाचे आराध्यदैवत आहेत. संत नामदेवांनी महाराष्ट्राबरोबरच पंजाबमधील श्री क्षेत्र घुमान येथे १८ वर्ष राहून समाजाला दिशा देण्याचे कार्य केले होते. त्यांना पंजाबमध्ये संत भगत नामदेव म्हणून ओळखले जाते. शीख धर्माच्या प्रमुख ग्रंथ गुरुग्रंथ साहेबामध्ये संत नामदेवांच्या ६१ दोह्यांचा समावेश आहे. त्यांच्या नावाने घुमान येथे विद्यापीठ सुरू करण्याची घोषणा पंजाब सरकारने केली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातही संत नामदेवांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांची जयंती राज्य सरकारने साजरी करण्याची मागणी अखिल भारतीय श्री क्षत्रिय अहिर शिंपी समाज, मध्यवर्ती संस्था यांच्यासह काही संघटनांनी केली होती.

 34,365 total views,  2 views today

Leave a Reply

Your email address will not be published.