छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील मृत्यूप्रकरणी दोषी दोघांवर कारवाई आमदार निरंजन डावखरे यांच्या प्रश्नावर विधान परिषदेत उत्तर

ठाणे, दि. २० (प्रतिनिधी) : कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एकाच दिवसात झालेल्या १८ रुग्णांच्या मृत्यूप्रकरणी नियुक्त केलेल्या चौकशी समितीच्या अहवालानंतर सहायक प्राध्यापक (असिस्टंट प्रोफेसर) व व्याख्यात्यावर (लेक्चरर) आज कारवाई करण्यात येईल, अशी माहिती राज्य सरकारच्या वतीने मंत्री उदय सामंत यांनी आज प्रश्नोत्तराच्या तासात दिली. भाजपाचे आमदार निरंजन डावखरे यांनी हा प्रश्न मांडला होता.
कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात १३ ऑगस्ट रोजी एकाच दिवसात १८ रुग्णांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणाच्या चौकशी संदर्भात आमदार निरंजन डावखरे यांनी विधान परिषदेत विविध प्रश्न उपस्थित केले. या रुग्णालयात कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली होती का, या प्रकरणी दोषी कर्मचाऱ्यांविरोधात कारवाई करणार का, अत्यवस्थ ९ ते १० रुग्ण अन्य रुग्णालयात हलविताना योग्य उपाययोजना करण्यात आल्या होत्या का, असा सवाल आमदार डावखरे यांनी केला. त्यावर उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सरकारच्या वतीने उत्तर दिले. छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात घटनेपूर्वी ४८ व त्यानंतर १२५ कर्मचाऱ्यांची तात्पुरत्या स्वरुपात अशा १९३ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या संदर्भात आरोग्य विभागाच्या आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली केलेल्या चौकशीचा अहवाल राज्य सरकारकडून विधीमंडळाच्या पटलावर ठेवला जाईल. तसेच रुग्ण हलविताना योग्य काळजी घेण्यात आली होती. या प्रकरणातील दोषी सहायक प्राध्यपक व व्याख्यात्यावर आज कारवाई केली जाईल, असे आश्वासन मंत्री उदय सामंत यांनी दिले.

 17,598 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.