नवीन वर्षात ऐतिहासिक ठाणे रेल्वे स्थानकाचे व ठाणे मुलुंड दरम्यान नवीन ठाणे रेल्वे स्थानकाचेही काम सुरू होणार – खासदार राजन विचारे

प्रतिनिधी – नुकताच संसदेत अधिवेशन काळात खासदार राजन विचारे यांनी ठाणे रेल्वे स्थानकाचा विकास कामांचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर खडबडून जागे झालेल्या RLDA रेल्वे अधिकाऱ्यांनी खासदार राजन विचारे यांच्यासोबत मल्टी मॉडेल हब या प्रकल्पाची विस्तृत चर्चा व पाहणी करण्यासाठी वेळ मागितली होती. आज खासदार राजन विचारे यांनी रेल्वे स्थानकाची पाहणी आयोजित केलेली आहे. त्यावेळी मध्य रेल्वेचे डी. जी. एम. दीपक शर्मा, RLDA चे DGM जैन, ए डी एन कल्याण, स्टेशन डायरेक्टर अरुण प्रताप, आर पी एफ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोस्था, रेल्वेचे व महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी तसेच शिवसेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आज या पाहणी दौऱ्या दरम्यान ठाणे रेल्वे स्थानकातील दररोज प्रवास करणाऱ्या आठ लाख प्रवाश्यांसाठी पर्यायी फलाटांची व्यवस्था कशी करता येईल याबाबत चर्चा झाली. फलाटावर डेकचे काम सुरू असताना खालील फलाटावर प्रवासी असल्यास काम करण्यास अडचणी निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता फलाट बंद करून दुसऱ्या फलाटावरून गाड्या सोडता येऊ शकतील यावर चर्चा करण्यात आली. नवीन वर्षात या कामास सुरुवात होणार आहे असे RLDA च्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलेले आहे.

मेंटल हॉस्पिटलच्या जागेवर होणारे नवीन रेल्वे स्थानक

तसेच ठाणे मुलुंड दरम्यान नवीन होणाऱ्या रेल्वे स्थानकाचे काम मार्गी लागल्यास स्थानकातील प्रवाश्यांचा अतिरिक्त पडणारा भार कमी होऊ शकेल. यासाठी ठाणे मुलुंड दरम्यान होणाऱ्या नवीन रेल्वे स्थानकातील सुरू झालेल्या नवीन स्टेशन परिचलन क्षेत्रातील विकास कामांची माहिती महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून घेण्यात आलेली आहे. त्यामध्ये स्टेशनकडे जाणारे ३ मार्ग विकसित करण्याचे काम सुरु आहे. पहिला मार्ग ज्ञानसाधना कॉलेजकडून स्टेशनकडे जाणारा, दुसरा मार्ग धर्मवीर नगराकडून स्टेशनकडे जाणारा, तिसरा मार्ग मुलुंड चेकनाका मॉडेला मिल कडून स्टेशनकडे जाणारा. या तीन मार्गिकांचे काम सुरु असून स्टेशन डेक, पार्किंग, व कंपाऊंड वॉल चे काम देखील तितक्याच गतीने सुरु आहे. ३०% काम पूर्ण झालेले आहे. डिसेंबर २०२४ पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे.

रेल्वे स्टेशनकरीत लागणारी स्टेशन बिल्डिंग व फलाटे रेल्वे रूळ इत्यादी ४ एकर जागेवर कामे रेल्वे स्वता करणार आहे. यासाठी १८४ कोटी खर्च होणार आहे. राज्य शासनाच्या आरोग्य विभागाकडून अद्याप रेल्वे विभागाला हस्तांतरित न झाल्याने याचे कामास सुरुवात होण्यास विलंब लागत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्या ठिकाणी काही सहकारी गृहनिर्माण संस्था एस आर ए प्रकल्पास परवानगी मिळण्याकरिता हायकोर्टात गेले असता मा. उच्च न्यायालयाने निकाल देत असताना अतिक्रमण झालेल्या झोपड्यांचे पुनर्वसन एस आर ए योजनेमार्फत ठाणे महापालिकेने तात्काळ करून घेण्याचे आदेश दिले आहेत परंतु या संदर्भात दिरंगाई होत असल्याने या कामाला गती प्राप्त होत नाही. खासदार राजन विचारे यांनी आयुक्त अभिजीत बांगर यांच्याशी चर्चा करून त्यांचे पुनर्वसन लवकर मार्गी लावा अशी विनंती केली आहे. तसेच गेले ७ ते ८ महिन्यापासून तयार झालेले दिघा गाव रेल्वे स्थानकाचे लोकार्पण थांबवून प्रवाशांना वेटीस धरण्याची खंत राजन विचारे यांनी व्यक्त केली आहे. या नवीन वर्षात देव त्यांना सद्बुद्धि देवो व दिघा गाव रेल्वे स्टेशन सुरु होऊदे ही आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना केली आहे.

मुंबई व कल्याण दिशेस होणारे नवीन पादचारी पूल २६ जानेवारी पर्यंत खुले होणार

खासदार राजन विचारे यांच्या सततच्या पाठपुराव्याने रेल्वे प्रवाश्यांना अपुरे पडणाऱ्या पादचारी पुलाची संख्या लक्षात घेता दोन नवीन पादचारी पूल महापालिकेकडून मंजूर करून रेल्वे कडून बांधून घेतले आहे. याचीही पाहणी आज करण्यात आली असून सदर दोन पादचारी पूल 26 जानेवारी पर्यंत खुले करून देणार असे रेल्वे अधिकाऱ्यांनी खासदार राजन विचारे यांना आश्वासन दिले आहे.

 21,792 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.