मीटर कापायला आले तर शिवसेना स्टाईल ने आंदोलन करण्याचा स्थायी समिती सभापती राम रेपाळे यांचा इशारा
ठाणे : वाढीव वीज बिलामुळे नागरिक प्रचंड हैराण असून लोकप्रतिनिधीना जाब विचारण्याची वेळ ठाणेकरांवर आली आहे. नागरिकांना वाढीव वीज बिले आली असल्याने शिवसेना नगरसेवकांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे महावितरणच्या अधिकाऱ्याना जाब विचारण्यासाठी ठाणे महापलिकेचे स्थायी समिती सभापती राम रेपाळे यांनी वागळे येथील महावितरण कार्यलाय गाठले. दरम्यान सत्तेत असलो तरी वाढीव वीज बिलाच्या विरोधात आम्ही नागरिकांच्या सोबत असून मीटर कापण्यासाठी कोणी आले तर शिवसेना स्टाईल ने आंदोलन करू असा इशारा यावेळी शिवसेनेच्या नगरसेवकांनी दिला. महावितरण कंपनीने कमी करून सरासरी बिले द्यावीत अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली असून विद्युत बिलाच्या प्रति यावेळी देण्यात आल्या. यावेळी नगरसेवक दीपक वेतकर, प्रकाश शिंदे,योगेश जानकर उपस्थित होते.
लॉकडाऊनच्या काळात वाढीव वीज बिल आलेल्या ग्राहकांना बिलांची रक्कम कमी करून दिली जाईल वा त्यांना परतावा दिला जाईल, असे आश्वासन काही दिवसांपूर्वी सरकारच्या वतीने देण्यात आले होते. मात्र अद्याप कोणताही निर्णय झाला नसून नागरिकांना वाढीव वीज बिले देण्यात येत आहेत. महावितरण कंपनी कडून लॉकडाऊन काळात वाढीव वीज बिलांची आकारणी करून वीजग्राहकांची पिळवणूक केली जात आहे. कोरोनाच्या काळात महावितरण कंपनीने एजन्सी नेमली होती, त्यांनी अंदाचे रिडींग घेतली आहे. तब्बल तीनपट बिले पाठवण्यात आले असून वाढीव बीज बिले कमी कमी करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.
महावितरण कंपनीने वेळेवर रिडींग घेतले असते तर वाढीव वीज बिले आली नसती. काही नागरिकांनी ऑनलाईन बिले भरली असून देखील वाढीव वीज बिले देण्यात आले आहेत. त्यामुळे संपूर्ण जबाबदारी महावितरण कंपनीची असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.राज्यात आम्ही सत्तेत जरी असली तरी मात्र आमची बांधिलकी जनतेशी आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, ऊर्जामंत्री नितीन राऊत, पालकमंत्री एकनाथ शिंदे हे लवकरात लवकर तोडगा काढून जनतेला दिलासा देतील अशी खात्री यावेळी देण्यात आली.
561 total views, 1 views today