शहापूर तालुक्यातील कोरोना रुग्णांवर भिवंडीतील रुग्णालयांमध्ये उपचार होणार

खासदार कपिल पाटील यांच्या मागणीला यश

शहापूर (शामकांत पतंगराव) : शहापूर तालुक्यातील कोविड सेंटरची रुग्णक्षमता संपुष्टात आल्यानंतर, उपचारापासून वंचित राहणाऱ्या शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागातील रुग्णांवर भिवंडी शहरातील कोविड सेंटर व रुग्णालयात उपचार केले जाणार आहेत. भाजपाचे खासदार कपिल पाटील यांनी शहापूरातील रुग्णांचे हाल लक्षात घेऊन तातडीने महापालिका आयुक्त डॉ. पंकज आशिया यांच्याशी संपर्क साधून ही व्यवस्था केली आहे.
शहापूर शहर व ग्रामीण भागातील रुग्णांसाठी शहापूरात कोविड सेंटर उभारण्यात आले आहे. मात्र, तालुक्यातील रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे कोविड सेंटर पूर्णपणे रुग्णांनी भरले आहे. या सेंटरमध्ये जागा नसल्यामुळे नव्या रुग्णांना दाखल केले जात नाही. तर भिवंडी शहर व तालुक्यातील रुग्णालये व कोविड सेंटरमध्ये जागा रिकाम्या आहेत. त्यामुळे शहापूरातील गंभीर परिस्थितीची माहिती मिळताच खासदार कपिल पाटील यांनी भिवंडी महापालिकेचे आयुक्त डॉ. पंकज आशिया यांच्याशी तत्काळ संपर्क साधला. तसेच शहापूरातील रुग्णांवर भिवंडी शहरातील इंदिरा गांधी रुग्णालय व महापालिकेच्या कोविड सेंटरमध्ये उपचार करण्याची विनंती केली. त्याला आयुक्त आशिया यांनी मंजुरी देऊन भिवंडीत १०० हून अधिक बेड उपलब्ध केले आहेत. जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्याशीही संपर्क साधून भिनार येथील केंद्रावरही शहापूरातील रुग्णांवर उपचार करण्याची विनंती केली. ती मान्य करण्यात आली.
शहापूरातील रुग्णांसाठी भिवंडीत १०० हून अधिक बेड उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे शहापूरातील रुग्णांनी कोविड सेंटरमध्ये दाखल होण्यासाठी तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ. तरुलता धानके यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन खासदार कपिल पाटील यांनी केले आहे. त्याचबरोबर शहापूर तालुक्यात नव्या कोविड सेंटरसाठी केवळ इन्फ्रास्ट्र्क्चर न उभारता आवश्यक वैद्यकिय कर्मचाऱ्यांसह रुग्णवाहिका उपलब्ध करुन द्याव्यात, अशी मागणी राज्य सरकारकडे केली आहे.

 425 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.