भारतीय मराठा संघाच्या वतीने करण्यात आला होता हा कार्यक्रम
ठाणे : आदर्श विद्यार्थी घडविण्याचे काम शिक्षक करीत असतात. देशाचे भविष्य ज्या नवजवान पिढीच्या हातात जाते ती आदर्शवादी पिढी शिक्षक या जबाबदारीतून घडवितात. सद्या कोरोना महामारीत आपल्या जीवाची पर्वा न करता शासनाच्या आदेशानुसार शिक्षक कोरोना रुग्णांचा सर्व्हे करत आहेत. यामुळे अशा शिक्षकांचा भारतीय मराठा संघाच्या वतीने कोरोना योद्धा म्हणून प्रमाणपत्र देऊन शिक्षक दिनाचे औचित्य साधून सन्मान करण्यात आला.
देशावर कोरोना महामारीचे संकट असताना सरकारने दिलेल्या आदेशानुसार शिक्षक प्रभागातील नागरिकांच्या घरी जाऊन कोरोना रुग्णांचा सर्व्हे करून मोठे समाज कार्य करत आहेत. शिवाय अनेक शिक्षक, शिक्षिका त्यांचे पुर्वीचे शारीरीक आजार रक्तदाब, मधूमेह व इतर अनेक आजाराने त्रस्त आहेत, परंतू शासकीय आदेशाचे पालन करीत आपली जबाबदारी पार पाडत आहेत. अशा शिक्षकांचा सन्मान होणे आवश्यक असल्याने भारतीय मराठा संघाच्या वतीने शिक्षक दिनाचे औचित्य साधून संघाच्या मुख्य कार्यालयात शिक्षकांचा सन्मान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिक्षिका अनघा जाधव, शिक्षिका तपस्या कश्यप, शिक्षिका सारिका सावंत, शिक्षिका सुविधा परब यांचा भारतीय मराठा संघाच्या वतीने कोरोना योद्धा प्रमाणपत्र देऊन संघाचे अध्यक्ष अविनाश पवार, कोशाध्यक्ष अजित जाधव, प्रदेश सचिव सदाशिव गारगोटे, प्रसिद्धी प्रमुख अमोल कदम यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
या प्रसंगी राज्यभरात कोरोना सर्व्हे करायचे काम शिक्षकांना सरकारने दिले आहे. सर्व्हे करण्याकरिता गेल्यावर नागरिक शिक्षकांना काही भागात सर्वेच करून देत नसून धक्काबुक्की करत असल्याचा प्रकार वारंवार समोर येत आहे. यामुळे कोरोना सर्व्हे करणाऱ्या शिक्षकांना सरकारने सुरक्षा व्यवस्था पुरवून सर्व्हे करताना अडथळा आनणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करून शिक्षकांना पाठबळ द्यावे असे भारतीय मराठा संघाचे अध्यक्ष अविनाश पवार यांनी कार्यक्रम प्रसंगी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संघाचे प्रसिद्धी प्रमुख अमोल कदम यांनी केले तर कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता संघाचे प्रदेश सचिव सदाशिव गारगोटे यांनी विशेष परिश्रम घेतले.
409 total views, 1 views today