रेल चाईल्ड संस्थेच्या महात्मा गांधी विद्यामंदिर डोंबिवली व कल्याण तालुका शारीरिक शिक्षण शिक्षक मंडळाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता उपक्रम
डोंबिवली : हाॅकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या ११५ व्या स्मृतिदिनानिमित्त अर्थात राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून, रेल चाईल्ड संस्थेच्या महात्मा गांधी विद्यामंदिर डोंबिवली व कल्याण तालुका शारीरिक शिक्षण शिक्षक मंडळाच्या संयुक्त विद्यमाने, “कल्याण तालुकास्तरीय आंतरशालेय ऑनलाईन क्रीडा विषयक लेखन स्पर्धा” २९ ते ३१ आॅगस्ट दरम्यान आयोजित केली होती. ही लेखन स्पर्धा इ. ५ वी ते ७ वी आणि इ. ८ वी ते १० वी या दोन गटांत घेण्यात आली. क्रीडा विषयक लेखन स्पर्धेत, छोट्या गटासाठी, माझा आवडता खेळ, माझा आवडता खेळाडू, आई मला खेळायला जायचंय…. आणि पी.टी.चा तास माझ्या आवडीचा असे विषय देण्यात आले तर मोठ्या गटासाठी गावाकडचे खेळ, खेळातील माझा आदर्श, माझे आवडते पी.टी. सर किंवा मॅडम आणि सण उत्सवातील खेळाचे स्थान असे विषय देण्यात आले होते. दोन्ही गट मिळून सुमारे ३५० विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला.
सध्या कोरोना प्रादुर्भावामुळे लाॅकडाऊन असल्यामुळे विद्यार्थी हे, खेळ, क्रीडा व शारीरिक शिक्षण या मानवी हालचालीशी संबंधित बाबींपासून तब्बल ५ महिने दूर राहिले. विद्यार्थ्यांच्या मनात दडलेल्या क्रीडा विषयक चळवळीला, लेखन स्पर्धेच्या निमित्ताने मोकळी वाट मिळाली, अशी प्रतिक्रिया शाळांचे मुख्याध्यापक व पालकांनी व्यक्त केली.
या क्रीडा विषयक लेखन स्पर्धेत कल्याण तालुक्यातील आठवली, टिटवाळा व घोटसई या ग्रामीण भागापासून ते कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील नावाजलेल्या शाळांमधील विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद लाभला.
राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांच्या क्रीडा विषयक भावनांना शब्दरुपातून मांडण्याची संकल्पना, महात्मा गांधी विद्यामंदिर शाळेचे शाळा समिती अध्यक्ष उल्हास झोपे, मुख्याध्यापक अंकुर आहेर, समन्वयक चंद्रकांत देठे तसेच कल्याण तालुका शारीरिक शिक्षण शिक्षक मंडळाचे अध्यक्ष प्रा. लक्ष्मण इंगळे, कार्याध्यक्ष प्रा. उदय नाईक यांनी एकत्रितपणे राबवली. तसेच या स्पर्धेची सूचना व्हाॅटसऍप सारख्या सामाजिक माध्यमांतून, प्राथमिक व माध्यमिक शाळेतील शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षकांनी तसेच सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांनी आपापल्या शाळेतील वर्गाच्या व्हाॅटसऍप ग्रुपवर पाठवून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. ही लेखन स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मंडळाचे पदाधिकारी व सभासदांचे सहकार्य लाभले. या स्पर्धेचा अंतिम निकाल, आंतरराष्ट्रीय खेळाडूच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात येणा-या ऑनलाईन वेबिनारच्या प्रसंगी जाहीर केला जाणार आहे.
1,055 total views, 1 views today