भाजपाच्या कोरोना काळातील कार्य अहवालाचे प्रकाशन

आमदार निरंजन डावखरे, संजय केळकर यांची उपस्थिती

ठाणे : कोरोना आपत्तीच्या काळात ठाणे शहरातील कानाकोपऱ्यात भाजपाचे नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केलेल्या कार्याचा अहवाल आज प्रकाशित करण्यात आला. भाजपाचे आमदार व जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे, आमदार संजय केळकर यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषदेत चार महिन्यांत केलेल्या सेवाभावी कामांची जंत्री मांडण्यात आली.
भाजपाच्या खोपट येथील कार्यालयात झालेल्या कार्यक्रमाला महापालिकेतील गटनेते संजय वाघुले, प्रदेश उपाध्यक्ष माधवी नाईक, श्वेता शालिनी, सचिव संदीप लेले, शहर सरचिटणीस विलास साठे, कैलास म्हात्रे आदी उपस्थित होते.
कोरोना काळात समाजातील प्रत्येक वंचित घटकाला मदत पोचेल, असे भाजपाचे नियोजन होते. त्याअनुषंगाने गरजूंना अन्नपाकिटे, धान्य, ज्येष्ठ नागरिकांना घरपोच किराणा सामान व औषधे, रक्तदान, डॉक्टरांसह वैद्यकिय कर्मचाऱ्यांना पीपीई किट व मास्क, सामान्य नागरिक व पोलिसांसाठी मास्क, स्थलांतरित कामगारांना अन्न व पादत्राणे, सोसायट्यांपर्यंत भाजीपाला, कोरोना चाचणीसाठी सवलतीत कमळ कवच, फिव्हर क्लिनिक, आरोग्य शिबिरे, क्वारंटाईन केंद्रातील रुग्णांना बिस्किटे व अन्नपाकिटे आदींची मदत करण्यात आली. पीएम केअर फंडातही मदत करून ठाण्यातील कार्यकर्ते व नागरिकांनी खारीचा वाटा उचलला. या काळात सातत्याने जनतेसाठी धावून जाणारे कोरोना योद्धा नागरिक व कार्यकर्ते यांचाही भाजपाने सन्मान केला. भाजपाने केवळ समाजाप्रती कर्तव्यभावनेने हे कार्य केले. यापुढील काळातही भाजपाचा प्रत्येक कार्यकर्ता सामान्यांच्या हाकेला धावून येईल, असे प्रतिपादन आमदार व जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे यांनी केले. या अहवालाच्या माध्यमातून जनतेपर्यंत माहिती पोचविण्याचा प्रयत्न आहे, असे डावखरे यांनी नमूद केले.
सामान्यांसह कोरोना रुग्णांना सुविधा मिळण्यासाठी भाजपाने प्रयत्न केला. कोरोना रुग्णांना बेड व आवश्यक उपचार, रुग्णांचे डायलिसिस यांच्याबरोबरच सुमारे ८५० हून अधिक गरीब मुलांना ऑनलाईन शिक्षणासाठी नेट पॅक देण्यात आले आहेत, अशी माहिती आमदार संजय केळकर यांनी दिली.
या वेळी कॉंग्रेसचे ओबीसी सेलचे प्रदेश सरचिटणीस, कोपरी ब्लॉक अध्यक्ष कृष्णा भुजबळ, प्रहार संघटनेचे ठाणे शहराध्यक्ष आनंद बनकर यांनी कार्यकर्त्यांसह भाजपामध्ये प्रवेश केला.

 346 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.