अनाधिकृत बांधकामांकडे अधिकाऱ्यांनी जाणूनबुजून दुर्लक्ष केल्याचा महापौरांचा आरोप


महापौर नरेश म्हस्के यांनी मागवला प्रशासनाकडे खुलासा
ठाणे : अधिकाऱ्यांनी मुद्दामहून ठाण्यातील काही भागात झालेल्या अनधिकृत बांधकामाकडे दुर्लक्ष केल्यामुळे चार ते पाच मजल्यांच्या इमारती आणि टॉवर केवळ लॉकडाऊनच्या काळात होऊ शकत नाही तर आधीपासून ही बांधकामे सुरु असल्याचा आरोप महापौर नरेश म्हस्के यांनी केला आहे . याबांधकामासदर्भात खुलासा करण्याचे निर्देश महापौरांनी प्रशासनाला दिले आहे.महापौरांनी यासंदर्भात अतिक्रमण विभागाच्या आयुक्तांना पत्र देखील दिले आहेत. ठाण्याच्या प्रथम नागरिक या नात्याने प्रसिद्धी माध्यमांना काय प्रतिक्रिया देऊ यासंदर्भात मार्गदर्शन करावे असा शालजोडीतला देखील नरेश म्हस्के यांनी अतिक्रमण विभागाला लगावला आहे.
कोरोनाच्या उपाय योजनांमध्ये पालिका प्रशासनाची सर्व यंत्रणा गुंतल्याचा फायदा घेत लॉकडाऊनच्या काळात कळवा, मुंब्रा आणि दिवा परिसरात झालेल्या अनधिकृत बांधकामांवर गुरुवारी अखेर ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने हातोडा टाकला . यामध्ये कळवा,आणि दिवा परिसरात एकाच वेळी कारवाई करण्यात आली तर कळव्यात एकावर एमआरटीपी अंतर्गत गुन्हा देखील दाखल करण्यात आला . मात्र या कारवाई नंतर आता कळवा, खारेगांव आणि दिवा परिसरात सुरु असलेल्या अनधिकृत बांधकामाबाबत प्रशासकीय यंत्रणा चांगलीच अडचणीत आली असून यासंदर्भात महापौर नरेश म्हस्के यांनी देखील अतिक्रमण विभागाकडे या बांधकामांबाबत खुलासा मागवला आहे.
पालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या आयुक्तांना त्यांनी पत्र दिले आहे. या पत्रात त्यांनी पालिका अधिकाऱ्यांच्या भूमिकेविषयीच संशय निर्माण केला आहे. ठाणे महापालिका क्षेत्रातील काही भागांमध्ये चार ते पाच मजल्यांच्या वाढीव बांधकामे झाली असून काही ठिकाणी टॉवरची कामे देखील सुरु असल्याच्या बातम्या प्रसीद्ध झाल्या असल्याचे त्यांनी आपल्या पात्रात नमूद केले आहे. विशेष म्हणजे राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी देखील याकडे लक्ष वेधले असल्याचे त्यांनी म्हंटले आहे. तीन ते चार मजल्यांचे बांधकाम आणि काही ठिकाणी तर टॉवरचे बांधकाम देखील सुरु असून केवळ लॉकडाऊनच्या काळात ही बांधकामे होणे शक्य नसून याधीच काही महिने ही बांधकामे सुरु असावी , मात्र पालिका अधिकाऱ्यांनी याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले असल्याचा आरोप महापौरांनी केला आहे. यासंदर्भात त्वरित खुलासा करण्याचे निर्देश त्यांनी पालिकेच्या अतिक्रमण विभागाला दिले आहे.
कोरोनाच्या काळात पालिकेची जवळपास सर्वच यंत्रणा गुंतल्याने याचा फायदा घेत या काळात अनधिकृत बांधकामे जोमाने सुरु असल्याचे निदर्शनास आले आहे. काही ठिकणी वाढीव बांधकामे देखील करण्यात आली असून या सर्व ही सर्व बांधकामे बेधडक सुरु असताना प्रशासकीय यंत्रणेचे दुर्लक्ष कसे झाले असा प्रश्न आता यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. अगदी कमी कालावधीत कळवा, खारेगांव परिसरात पाच ते सात मजल्यांचे मोठे टॉवर उभारून नागरिकांसाठी जीवघेण्या सापळ्यांची उभारणी झाली आहे. भविष्यात अशी बांधकामे पूर्ण करून त्यांचा अनधिकृत वापर सुरू होणार, हे उघड असूनही हे प्रकार वाढले असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.

 465 total views,  2 views today

Leave a Reply

Your email address will not be published.