`दार उघड उद्धवा दार उघड’!

ठाण्यात घंटानादात घुमणार

भाजपाचे शनिवारी मंदिरे उघडण्यासाठी आंदोलन

ठाणे : राज्यातील मंदिरे, गुरुद्वारा, जैन मंदिरांसह धार्मिक संस्था उघडण्याच्या मागणीसाठी भाजपाच्या वतीने ठाण्यात उद्या शनिवारी (ता. २९) घंटानाद आंदोलन करण्यात येणार आहे. या घंटानादात दार उघड उद्धवा दार उघड'च्या गजराबरोबरच झोपेत असलेल्या राज्य सरकारला जागे करण्यात येईल, अशी माहिती भाजपाचे आमदार व जिल्हाध्यक्ष निरंजन वसंत डावखरे यांनी आज पत्रकाद्वारे दिली. कोरोना प्रादुर्भावाच्या काळात जनजीवन पूर्ववत करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने राज्यातील मास-मदिरा 'पुनःश्च हरी ओम' च्या नावाखाली सर्व काही चालू केले. मात्र संतांची भूमी असलेल्या महाराष्ट्रात 'हरी' ला मात्र बंदिस्त ठेवले आहे. केंद्र सरकारने मंदिरे उघडण्याचे निर्देश दिल्यानंतर, राज्यातील भाविक व सर्वसामान्य नागरिकांकडून मंदिरे उघडण्याची मागणी करण्यात आली. मात्र, राज्य सरकारने त्याकडे सातत्याने दुर्लक्ष केले. त्यामुळे झोपी गेलेल्याठाकरे सरकार’ला जागे करण्यासाठी राज्यातील संत, महंत, आचार्य, धर्माचार्य, धार्मिक, अध्यात्मिक व सांप्रदायिक क्षेत्रातील मंडळी यांच्याबरोबरच देवस्थाने, तीर्थक्षेत्रे येथील उदरनिर्वाह निगडीत असलेले व्यावसायिक राज्यभर शनिवारी आंदोलन करणार आहेत. त्यानुसार ठाण्यातही आंदोलन होईल, अशी माहिती निरंजन डावखरे यांनी दिली.
ठाण्यातील मुख्य आंदोलन जागृत देवस्थान कौपिनेश्वर मंदिरासमोर शनिवारी सकाळी ११ वाजता आंदोलन होणार आहे. त्यात आमदार निरंजन डावखरे, आमदार संजय केळकर यांच्यासह कार्यकर्ते सहभागी होतील. तर ठाण्यातील अन्य ११ ठिकाणच्या मंदिरांसमोरही मंडल अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली एकाच वेळी ११ वाजता आंदोलन करण्यात येणार आहे. त्यात भाजपा कार्यकर्त्यांप्रमाणेच आध्यात्मिक आघाडी, धार्मिक संस्थांचे प्रतिनिधीही सहभागी होतील.

 426 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.