वार्षिक कर भरणार्‍या राज्यातील वाहनांना रस्ते करमाफी

परिवहन मंत्र्यांनी दिलेला शब्द पाळला

मुंबई : कोरोना महामारीमुळे उद्धभवलेल्या आपत्कालीन परिस्थितीत गेले अनेक महिन्यांपासून राज्यातील तमाम वाहतूकदार संघटनांच्या वतीने शिवसेना अंगीकृत शिव वाहतूक सेनेने राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांचेकडे विविध मागण्यासंदर्भात सातत्याने पाठपुरावा केला होता. यापैकी टाळेबंदी कालावधीत झालेले वाहतूकदारांचे आर्थिक नुकसान लक्षात घेता रस्ते करात सूट द्यावी ही प्रमुख मागणी करण्यात आली होती.
यासंदर्भात राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी १८ मे रोजी वाहतूकदारांचे प्रतिनिधित्व करणार्‍या बस अँड कार ऑपरेटर्स कॉन्फेडरेशन ऑफ इंडिया, महाराष्ट्र राज्य ट्रक-टेम्पो-टँकर्स-बस वाहतूक महासंघ, मुंबई बस मालक संघटना, फेडरेशन ऑफ टुरिस्ट टॅक्सी ऑपरेटर्स आणि शिव वाहतूक सेना या विविध संघटनांशी वेबिनारच्या माध्यमातून संवाद साधत वाहतूकदारांचे प्रश्न जाणून घेताना या समस्यांबाबत ठोस निर्णय घेणार असल्याचे आश्वासन दिले होते. याअनुषंगाने परिवहन मंत्री यांचे अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय वाहतूक कृती दलाची स्थापना देखील करण्यात आली होती.
या पार्श्वभूमीवर आज राज्यातील वार्षिक कर भरणार्‍या नोंदणीकृत वाहनांना १ एप्रिल ते ३० सप्टेंबर २०२० अशी ६ महिन्यांची रस्ते करमाफी देण्याची घोषणा परिवहन मंत्री अनिल परब यांनी केली असून जवळपास ११ लाख ४० हजार वाहनधारकांना याचा लाभ मिळणार आहे. यात टुरिस्ट टॅक्सी, खासगी वाहतूक वाहने, शालेय आणि लक्झरी बसेस, मालवाहतूक वाहने, उत्खनन वाहने यांचा समावेश असून याकरिता सुमारे ७०० कोटी रुपयांचा अधिभार राज्य सरकारवर पडणार आहे.
राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयाबद्दल राज्यातील सर्व वाहतूकदारांनी समाधान व्यक्त केले असून शिव वाहतूक सेनेचे सरचिटणीस मोहन गोयल यांनी या महत्त्वपूर्ण निर्णयाबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, परिवहन मंत्री अनिल परब आणि महाविकासआघाडी सरकारचे आभार व्यक्त केले आहेत.

 368 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.