गर्भवती मातांना २५ दिवस पोषक आहार

मुख्यमंत्री सचिवालयाच्या आदेशानुसार जिल्हा परिषदेने दिली पनवेल संघर्ष समितीला माहिती

पनवेल : कोविडच्या पार्श्वभूमीवर गर्भवती मातांच्या आरोग्याची हेळसांड होऊ नये याकडे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे लक्ष वेधण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते कांतीलाल कडू यांनी पत्रव्यवहार केला होता. मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून रायगड जिल्हा परिषदेकडे या संदर्भात अहवाल मागविला होता. त्यात महिन्यातून गर्भवती स्तनदा मातांना २५ दिवस पोषक आणि सकस अन्न पुरवठा केला जातो अशी माहिती दिली आहे. त्याची एक प्रत कडू यांना पाठविण्यात आली आहे.
कोविडच्या महामारीत सर्वांत जास्त ससेहोलपट झाली ती गर्भवती मातांची. त्यांना वेळेवर अन्न आणि उपचार मिळू न शकल्याने पनवेल संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी पत्रव्यवहार केला होता. त्याशिवाय रायगड जिल्हा परिषद आणि पनवेल महापालिकेकडेही याबाबत विचारणा केली होती. त्यानुसार मुख्यमंत्री सचिवालयाच्या कोकण कक्षाकडून कडू यांच्या पत्राबाबत दोन्ही आस्थापनांकडे कार्यवाही करण्यासंदर्भात विशेष कार्य अधिकारी सिद्धराम सारेमठ यांनी पत्र पाठविले होते.
पनवेल महापालिकेने गर्भवती महिलांच्या आरोग्याची काळजी घेत असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि कडू यांना कळविले आहे. तर रायगड जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन मंडलिक यांनीही माहिती देताना महिन्यातील २५ दिवस गहू, मसूरडाळ, मुगडाळ, मिरची पावडर, हळद, मीठ, सोयाबीन, तेल, चवळी, मटकी असा आहार पुरवण्यात येत असल्याची लेखी माहिती मुख्यमंत्री सचिवालय आणि कांतीलाल कडू यांना पोस्टाने पाठविली आहे. कोविडमुळे पोस्ट सेवा बंद असल्याने ही माहिती उशिराने कडू यांना मिळाली आहे.

आहार मिळत नसेल तर तक्रार करा: कडू

ग्रामीण आणि शहरी भागात अंगणवाड्यांमधून त्या भागातील गर्भवती मातांना पोषक आहार आणि धान्य, कडधान्ये मिळत नसतील त्यांनी आमच्याकडे लेखी तक्रार करावी, असे आवाहन पनवेल संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांनी केले आहे.
व्हाटसअप नंबर: सचिन पाटील (8652348777), सुरज म्हात्रे (8652032875), भास्कर भोईर (8108197777) या क्रमांकावर पूर्ण पत्ता, फोन नंबरसह तक्रार करावी.

 422 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.