ठाण्यातील दुकाने ९ ते ७ पर्यंत उघडी ठेवा

आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांना निवेदन देऊन भाजपाने केली मागणी

ठाणे : मुंबईच्या धर्तीवर ठाणे महापालिका क्षेत्रातील दुकानेही सणासुदीचा काळ लक्षात घेऊन सकाळी ९ ते सायंकाळी ७ पर्यंत उघडी ठेवण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी भाजपाने केली आहे. आमदार व जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे, आमदार संजय केळकर यांच्या नेतृत्वाखाली नगरसेवकांनी आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांची भेट घेऊन निवेदन दिले.
ठाणे महापालिका क्षेत्रात २० मार्चपासून सुरू झालेल्या लॉकडाऊनला सामान्य नागरिकांप्रमाणेच व्यापाऱ्यांनीही सहकार्य केले. मात्र, आता दुकानभाडे, वीजबिल, नोकरांच्या वेतनाबरोबरच कर्जाचे हप्ते आदींमुळे व्यापारी आर्थिक अडचणीत आले आहेत. महापालिका क्षेत्रात सध्या पी-१, पी-२ नियमाप्रमाणे दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, त्यात व्यापाऱ्यांना मर्यादा येत आहेत. त्याचबरोबर ग्राहकांचीही गैरसोय होत आहे, असे भाजपाने निवेदनात म्हटले आहे.
मुंबई महापालिकेने मुंबई शहरातील दुकाने सकाळी ९ ते सायंकाळी ७ पर्यंत उघडी ठेवण्याचा निर्णय घेतला. त्याचधर्तीवर सणासुदीचा काळ लक्षात घेऊन ठाणे महापालिका क्षेत्रातही सर्व दुकाने सकाळी ९ ते सायंकाळी ७ पर्यंत उघडी ठेवण्यास परवानगी द्यावी. त्यातून ग्राहकांची गर्दीही विभागली जाईल, असे भाजपाचे जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे यांनी निवेदनात म्हटले आहे. या शिष्टमंडळात महापालिकेतील गटनेते संजय वाघुले, मुकेश मोकाशी, संदीप लेले, सुनेश जोशी, मृणाल पेंडसे यांचा समावेश होता.
क्वारंटाईन केंद्रात महिला सुरक्षेविषयी उपाययोजनांची मागणी
बाळकूम येथील विशेष कोविड रुग्णालयात महिलांची सुरक्षितता धोक्यात आल्याचा प्रकार घडला होता. असा प्रकार निंदाजनक व अत्यंत गंभीर असून, भविष्यात महापालिका क्षेत्रातील रुग्णालये व क्वारंटाईन सेंटरमध्ये असा प्रकार टाळण्यासाठी विविध उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही भाजपाने निवेदनाद्वारे केली आहे.

 367 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.