गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड, आनंद परांजपे यांनी केले प्लाझ्मा दान


कोरोनावर मात करणार्‍यांनीही प्लाझ्मादान करावे- डॉ. आव्हाड

ठाणे :  गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून ब्लड लाईन या रक्तपेढीमध्ये जाऊन  प्लाझ्मादान केले. डॉ. आव्हाड यांच्यासोबत शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनीदेखील प्लाझ्मादान केले. यावेळी त्यांनी,“ कोरोनातून मुक्त झालेल्या सर्वच लोकांनी प्लाझ्मादान करावे; जेणेकरुन इतर रुग्णांना त्याचा लाभ होईल, असे आवाहन केले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी घेतला होता. ठाणे शहरात कोणत्याही प्रकारचे होर्डींग्ज लावू नये; त्याऐवजी कोविड योद्ध्यांना आणि गोरगरीब जनतेला लाभदायक उपक्रम राबवा, असे आवाहन त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना केल्या होत्या. त्यानुसार, कार्यकर्त्यांनीही ठिकठिकाणी अन्नधान्य वाटप, सॅनिटायझर, मास्कवाटप असे उपक्रम राबविले.
डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी काही दिवसांपूर्वीच कोरोनावर मात केली आहे. कोरोनामुळे डॉ. जितेंद्र आव्हाड यांची प्रकृती चिंताजनक झाली होती. त्यावर त्यांनी मात केली आहे. आयसीएमआरच्या संशोधनामध्ये कोरोनावर मात केलेल्या रुग्णांचा प्लाझ्मा उपचारासाठी लाभदायक ठरत असल्याचे स्पष्ट झालेले आहे. त्यामुळे डॉ. आव्हाड यांनी ब्लडलाईन रक्तपेढीमध्ये जाऊन प्लाझ्मा दान केले. यावेळी कोरोनावर मात केलेले शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनीदेखील डॉ. आव्हाड यांच्यासोबत प्लाझ्मादान केले.
यावेळी त्यांनी सांगितले की, जर कोरोनातून मुक्त झालेल्या प्रत्येक माणसाने प्लाझ्मा दान केला तर महाराष्ट्र कोरोनामुक्त व्हायला वेळ लागणार नाही. त्यामुळेच आपण हे दान केले आहे. इतरांनीही हे दान करावे. तर, आनंद परांजपे यांनी,  आम्ही कोरोनावर मात केली आहे. आता इतर कोरोनाग्रस्तांना बरे करण्याची जबाबदारी आपली आहे. त्यासाठीच आम्ही प्लाझ्मा दान केले आहे. या निमित्ताने आपण कोरोनामुक्त झालेल्या सर्वच रुग्णांना प्लाझ्मा दान करण्याचे आवाहन करीत आहोत, असे सांगितले.
दरम्यान,  ठाणे शहरातील ब्लड लाइन या रक्तपेढीला प्लाझ्मा स्वीकारण्याची परवानगी मिळाली असून वाढदिवसाच्या अनुषंगाने गृहनिर्माण मंत्री  डॉ. जितेंद्र आव्हाड हे आपला प्लाझ्मा दान करुन बुधवारपासून या प्रक्रियेला सुरुवात करणार आहेत, अशी माहिती ब्लड लाईनच्या डॉ. शिल्पा जैन यांनी दिली.  ठाणे-मुंबईमध्ये सहा ठिकाणीच प्लाझ्मा संकलन करण्यात येत होते. मुंबईमध्ये चार आणि नवी मुंबई , नालसोपार्‍यात  प्रत्येकी एका ठिकाणी हे संकलन करण्यात येत होते. परिणामी, वाहतुकीच्या समस्येमुळे ठाण्यातील रुग्णांना त्याचा लाभ घेणे जिकिरीचे होत होते. मात्र, आता ही समस्या निकाली निघाली आहे. ठाणे शहरातील ब्लड लाइन या रक्तपेढीला ही परवानगी मिळाली आहे. या रक्तपेढीमध्ये एकावेळी तीन जणांचे प्लाझ्मा संकलन करणे शक्य होणार असून किमान १०० जणांचे प्लााझ्मा साठवणे शक्य होणार आहे. , अशी माहिती डॉ. जैन यांनी दिली.

*डॉ. आव्हाड यांच्या हस्ते मास्क, ऑक्सिमीटर, थर्मल गन अन् स्वयंरोजगारासाठी टेम्पोचे वाटप*

डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या आवाहनानुसार परिवहन समिती सदस्य शमीम खान आणि नगरसेवक शानू पठाण यांच्यावतीने सुमारे १० हजार मास्क, १ हजार ऑक्सीमीटर, ५०० थर्मल स्कॅनिंग गन  आणि १ हजार कुटुंबांना धान्यवाटप करण्यात आले. या उपक्रमाचे प्रातिनिधीक वाटप डॉ. आव्हाड यांच्या निवासस्थानी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करुन करण्यात आले. तर, ‘मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेतून बेरोजगारांना स्वयंरोजगाराची संधी’ या उपक्रमांतर्गत बेरोजगारांना भाजीविक्रीसाठी टेम्पोचे वाटप करण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन द फार्मर स्टँडचे प्रोप्रायटर सचिन पवार यांनी केले होते. या उपक्रमाचा भाग म्हणून सत्यजित तांबे, भरत श्रीमान, सुमित कांबळे, ईश्वर पाटील, सुयश परीट या पाच प्रातिनिधीक लाभार्थ्यांना टेम्पोचे गृहनिर्माण मंत्री डॉ. आव्हाड यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. यावेळी शहराध्यक्ष आनंद परांजपे, प्रदेश चिटणीस सुहास देसाई, माजी विरोधी पक्षनेते मिलींद पाटील, परिवहन समिती सदस्य नितीन पाटील, हेमंत वाणी, माजी नगरसेवक अमीत सरय्या राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्यकारिणीचे सदस्य, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

 364 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.