मटका किंग जिग्नेश ठक्कर हत्येप्रकरणी गुजरातचा शूटर जाळ्यात

पोलीस उपायुक्तांनी केले खंडणी विरोधी पथकाचे विशेष कौतुक, पथकाला पाच हजरांचे बक्षीस जाहीर

ठाणे : कोरोना महामारीच्या काळात महाराष्ट्र पोलीस दल आपले कर्तव्य अधिक जबाबदारीने पार पाडत असल्याचे आपल्याला पदोपदी दिसून येत आहे. मागच्या शुक्रवारी हत्या झालेल्या मटका किंग जिग्नेश ठक्कर च्या मारेकऱ्याला अवघ्या तीन दिवसात गुजरात येथून अटक करण्यात ठाणे खंडणी विरोधी पथकाला यश आले आहे. या पथकाने तातडीने तपास करून आरोपीला अटक केल्याबद्दल ठाणे पोलीस उपयुक्त दीपक देवराज यांनी वैयक्तिकरित्या विशेष कौतुक करत पथकाला पाच हजरांचे बक्षीस जाहीर केले आहे.
मटका किंग जिग्नेश ठक्कर याच्या हत्येप्रकरणी सोमवारी ठाणे पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने जयपाल दुलगज उर्फ जपान या शुटरला अहमदाबाद (गुजरात) येथून ताब्यात घेतले. त्याच्याविरोधातील पुढील कारवाईसाठी पथकाने त्याला महात्मा फुले पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. जिग्नेश ठक्करची शुक्रवारी रात्री कल्याण रेल्वे स्थानक परिसरात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.
काम आटोपुन कार्यालयातून घरी जाताना हल्लेखोरांनी जिग्नेश ठक्करवर पाच गोळ्या झाडल्या होत्या. जिग्नेश याचे ठाणे, कल्याण आणि उल्हासनगर भागात अनेक पत्त्यांचे क्लब असून तो क्रिकेटवर लावण्यात येणाऱ्या सट्टा बाजारात बुकी म्हणून देखील काम करीत होता. त्याचा बालपणीचा मित्र धर्मेश उर्फ ननू शहा हा त्यास या धंद्यात साथ देत होता. गुंड प्रवृत्तीच्या धर्मेश याचे धंद्यातील पैशावरून जिग्नेश सोबत काही दिवसांपूर्वी वाद झाला अन् येथूनच दोघा मित्रांमध्ये कट्टर दुष्मनीस सुरुवात झाली. धर्मेश याचा मित्र चेतन पटेल व जिग्नेश मध्ये २९ जुलै रोजी वाद झाला व तो हाणामारीपर्यन्त पोहचला. याचवेळी धर्मेश याने जिग्नेश याचा काटा काढायचे ठरवले. आपला दबदबा रहावा यासाठी धर्मेशने जिग्नेश यास ठार करण्याचा कट रचला. त्यानुसार धर्मेशने जयपाल व इतर दोघा तिघा साथीदारांची मदत घेत शुक्रवारी रात्री कल्याण स्टेशन जवळच्या सुयश प्लाझा बिल्डिंग कम्पाउंड मध्ये जिग्नेशवर पाच गोळ्या झाडून त्याची निर्घृण हत्या केली. याप्रकरणाचा समांतर तपास ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या खंडणी विरोधी पथकाकडून सुरू होता. दरम्यान, यातील आरोपी जयपाल हा गुजरात राज्यातील अहमदाबादमध्ये असल्याची माहिती खंडणी विरोधी पथकाला मिळाली. या माहितीच्या आधारे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार कोथमिरे यांच्या पथकाने मुख्य सुत्रधारापैकी एक असणाऱ्या जयपाल उर्फ जपान यास अहमदाबाद येथून अटक केली. जिग्नेशला जयपालनेच चार गोळ्या झाडून ठार केल्याची माहिती चौकशीत समोर आली आहे. याप्रकरणाच्या पुढील कारवाईसाठी खंडणी विरोधी पथकाने त्याला महात्मा फुले पोलिस ठाण्याच्या स्वाधीन केले. पथकाने त्याला महात्मा फुले पोलिस ठाण्याच्या स्वाधीन केले.

 1,066 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.