यापुढील काळात रोटरी क्लब दरमहा विविध खेड्यात जाऊन आरोग्य शिबिरे आयोजित करणार असल्याचे अध्यक्ष डाॅ. श्रद्धा सोमण यांनी सांगितले.
बदलापूर : रोटरी क्लब ऑफ बदलापूर इंडस्ट्रियल एरियातर्फे अंबरनाथ तालुक्यातील ग्रामिण भागातील आदिवासी पाड्यांवर लहान मुलांसाठी आरोग्य तपासणी व औषध वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. २६४ मुलांनी या शिबिराचा लाभ घेतला. रोटरी क्लब दरमहा विविध खेड्यात जाऊन आरोग्य शिबिरे आयोजित करणार असल्याचे अध्यक्ष डाॅ. श्रद्धा सोमण यांनी सांगितले.
अंबरनाथ तालुक्यातील दातीरची वाडी, धारोळची वाडी, कुराडपाडा आणि कुडेरान या चार आदिवासी पाड्यांवर हे शिबीर आयोजित करण्यात आले होते. या अंतर्गत मुलांच्या शरीरातील रोग प्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी २ वर्षांपासून ते १४ वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी आयर्न, तसेच व्हिटामीन सी आणि डी या औषधांचे २ महीने पुरेल इतके वाटप यावेळी करण्यात आले. सर्व मुलांना जंताचे आणि तापाचे औषध देण्यात आले. ॲनिमिक कंडीशन असलेल्या मुलांना प्रोटीन पावडर आणि प्रोटीन बिस्किट्सही वाटण्यात आली. २ वर्षाखालील मुलांची संपूर्ण तपासणी पेडिॲट्रिशीयन रोटरीयन डॉ. दिलीप मानगेकर यांनी केली. त्यांना विविध औषध आणि ड्रॉप्स ही दिले. तसेच या छोट्या मुलांच्या मातांनाही प्रोटीन पावडरची पाकीटे आणि टॉनिक देण्यात आले.
कुडेरानच्या सरपंच बेबी प्रकाश कडाळी आणि दातीर वाडीच्या सरपंच अंजू सुरेश हिंदोळा यावेळी उपस्थित होत्या. धरोळ येथील शिबिराला आदिवासी विकास संघटना, ठाणे जिल्हा अध्यक्ष संतोष भगत, अंबरनाथ तालुका अध्यक्ष रामदास शिंगळे, ठाणे जिल्हा सचिव विकास हिंदोळे आदी उपस्थित होते.या शिबिरासाठी दातिरच्यावाडीच्या काशिनाथ लोते यांचे मोलाचे सहकार्य लाभले. त्यांनी रोटारीतर्फे आदिवासी मुलांसाठी राबविलेल्या या उपक्रमाचे कौतुक करून आभार मानले.
या कार्यक्रमासाठी रोटरी अध्यक्ष डॉ. श्रद्धा सोमण, डॉ. दिलीप मानगेकर, अमित पाध्ये, कपिल पढेर, प्रसाद पल्लीवाल, शशांक सिनलकर आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
662 total views, 1 views today