येत्या आठवड्यात पालिकेचे कोविड रुग्णालय सुरु होईल

उपविभागीय अधिकारी तथा पालिकेचे प्रशासक जगतसिंग गिरासे यांनी दिली माहिती

बदलापूर : बदलापूर पालिकेतर्फे येत्या आठवड्यात पश्चिमेकडील गौरी सभागृहात कोविड रुग्णालय सुरु करण्यात येईल. यासाठी प्रशासनाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. यासाठी शहरातील इंडियन मेडिकल असोसिएशनचे डॉक्टर सहकार्य करणार असल्याचेही गिरासे यांनी सांगितले. दरम्यान गौरी हॉल येथील कोविड हॉस्पिटल मुळे बदलापूरकरांना फार मोठा दिलासा मिळणार असल्याचा विश्वास आमदार किसन कथोरे यांनी व्यक्त केला.
गुरुवार ३० जुलै रोजी सायंकाळी बदलापूर पालिका सभागृहात आमदार किसन कथोरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. यावेळी उपविभागीय अधिकारी तथा पालिकेचे प्रशासक जगतसिंग गिरासे यांनी वरील माहिती दिली. बदलापूर शहरातील इंडियन मेडिकल असोसिएशन ( आय एम ए) चे प्रतिनिधी डॉ. विनायक कुबल, डॉ. जितेंद्र चांदोरकर, डॉ. कृष्णा निमसाखरे, मुख्याधिकारी दिपक पुजारी, तहसीलदार जयराज देशमुख, पालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश अंकुश, नोडल अधिकारी डॉ. हरेश पाटोळे, माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे, भाजपा शहर अध्यक्ष संजय भोईर, माजी नगरसेवक संजय गायकवाड, भाजपा सरचिटणीस मिलिंद धारवाडकर, अभियंता जयेश भैरव आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
पश्चिमेकडील गौरी हॉल येथे कोविड हॉस्पिटल सुरू करण्यासंबंधी चर्चा झाली. आय एम ए तर्फे या कोविड हॉस्पिटल साठी एम डी डॉक्टर्स उपलब्ध करण्याचे निश्चित करण्यात आले. या हॉस्पिटल मध्ये सुरुवातीला ऑक्सीजन सुविधा असलेल्या १०० बेड्स व आय सी यु च्या १० बेड्स सुरू करण्यात येतील. त्या साठी १५ M.B.B.S, B.H.M.S व B.A.M.S डॉक्टर्स, ३० नर्सेस व सुमारे ४० वॉर्ड बॉय असे कर्मचारी नेमण्यात आल्याचे पालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश अंकुश यांनी सांगितले. या हॉस्पिटल मध्ये आपली सेवा देणाऱ्या डॉक्टर्सना सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील त्याच प्रमाणे योग्य मानधनासह शासनाच्या आदेशाप्रमाणे २५ लाखाचा आरोग्य विमा व ५० लाखाचा विमा देण्यात येईल असे प्रशासक जगतसिग गिरासे यांनी सांगितले. रुग्णालयात लागणारे सर्व साहित्य प्रशासन पुरवणार आहे. या रुग्णालयाच्या माध्यमातून बदलापूर शहरातील जनतेला सध्याच्या कोरोनाच्या संकटात मोफत उपचार मिळणार असल्याचे प्रशासक गिरासे यांनी सांगितले.
पालिकेचे हे रुग्णालय तातडीने सुरु करण्यासाठी प्रशासनाने तांत्रिक बाबीत न अडकता या रुग्णालयात द्यावयाच्या सुविधांबाबत कामे ठेकेदारांना वाटून द्यावी जेणे करून अधिक गतीने पूर्ण होऊन शहरातील नागरिकांची खाजगी रुग्णालयात होणारी आर्थिक लूट थांबून चांगली आरोग्य सेवा विनामूल्य उपलब्ध हॊईल असे शिवसेना शहर प्रमुख व माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांनी सांगितले. ठेकेदारानीही या रुग्णालयाच्या केलेल्या कामाचे बिल थकवले जाणार नाही, त्यांची बिले वेळेत देण्यासाठी आमदार किसन कथोरे व मी जबाबदारी घेत असल्याचेही वामन म्हात्रे यांनी सांगितले.
मुंबई ठाण्याच्या रुग्णालयात यापुढे आपल्या भागातील रुग्णांना प्रवेश नाकारला जाणार नाही. तसे कुठे निदर्शनास आले तर जरूर सांगावे, कोरोनाचा हा काळ संपल्यावर त्या त्या महापालिकेशी संघर्ष करण्याची आपली भूमिका असल्याचे आमदार किसन कथोरे यांनी पुन्हा स्पष्ट केले. या मोठ्या शहरांना सर्व सुविधा आणि महत्वाचे म्हणजे पाणी पुरवठ्यासाठी जर ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नागरिकांनी जमिनी देवून मुबलक पाणीही द्यायचे आणि त्यांना जर आरोग्य सुविधा हि महापालिका देणार नसेल तर त्यांच्याशी सांघर्षाची भूमिका घेणार असल्याचे कथोरे यांनी यावेळी सांगितले. शहरातील डॉक्टरांनी या रुग्णालयासाठी सहकार्य करावे त्यांना कोणतीही अडचण येणार नाही अशी ग्वाही सुद्धा कथोरे यांनी यावेळी दिली.
बदलापूर मध्ये मोफत कोरोना टेस्टिंग सेंटर साठी आमदार किसन कथोरे यांनी आपल्या आमदार निधीतून २० लाख रुपयांचा निधी दिला असल्याचे प्रशासकीय अधिकारी जगतसिंग गिरासे यांनी सांगितले. शहरातील डॉक्टर्स असोसिएशनने आमदार किसन कथोरे यांच्या विनंतीला मान देऊन या कोविड हॉस्पिटलची जबाबदारी स्वीकारल्या बद्दल भाजपाचे शहर अध्यक्ष संजय भोईर यांनी सर्व डॉक्टर्सचे आभार मानले.
बैठक संपल्यावर आमदार किसन कथोरे यांनी पदाधिकारी, अधिकारी आणि इंडियन मेडिकल असोसिएशनच्या पदाधिकार्त्यांसह गौरी हॉलची पाहणी केली. येत्या ५-६ दिवसात हे हॉस्पिटल सुरू करण्यासाठी युद्ध पातळीवर काम करण्याचे आदेश आमदार किसन कथोरे यांनी प्रशासनाला दिले.

 384 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.