५ लाखांच्या अफिमसह तिघांना बाजारपेठ पोलिसांनी केली अटक

राजस्थानमधून कल्याणमध्ये विक्रीसाठी आणले होते हे अफीम
कल्याण : अंमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या तिघांना कल्याणच्या बाजारपेठ पोलिसांनी अटक केले असून त्यांच्याकडून तब्बल ५ लाख २२ हजार रुपये किमतीचे अफीम हस्तगत करण्यात आले असून सुरेश नारायणलाल कुमहार, सोमाराम प्रल्हादजी प्रजापती आणि भरत गमनाराम चौधरी अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावं असल्याची माहिती कल्याण परिमंडळ ३ चे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी दिली.
कल्याण पश्चिमेच्या दुर्गाडी किल्ला परिसरात काही जण अंमली पदार्थांच्या विक्रीसाठी येणार असल्याची माहिती बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस नाईक सचिन साळवी आणि नितीन भोसले यांना मिळाली होती. त्यानूसार पोलीस निरीक्षक यशवंत चव्हाण, दिलीप फुलपगारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक पी.एस.सानप, हवालदार टी. के.पावशे, पोलीस नाईक नितीन भोसले, सचिन साळवी, साबीर शेख, जी.एन.पोटे, राजाराम सांगळे आदींच्या पथकाने दुर्गाडी परिसरात सापळा रचला.
पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास जुन्या दुर्गाडी पुलावरून हे तिघे जण बाईकवर एकत्र येत असताना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. या तिघांचीही तपासणी केली असता सोमाराम प्रजापतीकडे सुमारे एक किलोपेक्षा अधिक अफीम आढळून आले. याबाबत पोलिसांनी त्यांच्याकडे विचारपूस केली असता राजस्थानमधून कल्याणात विक्रीसाठी हे अफीम आणल्याचे त्यांनी सांगितले. या अफीमची बाजारात ५ लाख २२ हजार रुपये इतकी किंमत असून ५०० रुपये प्रतिग्रॅम अशी त्याची विक्री होते. तर या तिघांविरोधात बाजारपेठ पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याची  माहिती पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी दिली. 

 727 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.