कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साधेपणाने करणार उत्सव
ठाणे : कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर मुंबई पाठोपाठ ठाण्यातील गणेशोत्सव मंडळांनी यावर्षी मोठया प्रमाणावर उत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. ठाण्यातील नरवीर तानाजी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यंदाचा गणेशोत्सव सार्वत्रिकरित्या साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती मंडळाचे प्रमुख मार्गदर्शक तथा गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी दिली.
वैविध्यपूर्ण देखावा आणि सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या नरवीर तानाजी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे गेली ४० वर्षे अखंडीतपणे गणेशोत्सव साजरा करण्यात येत असतो. गणेशोत्सवाच्या काळात अनेक सामाजिक उपक्रमही या मंडळाच्या वतीने राबविण्यात येत असतात. मात्र, सध्या कोरोना महामारीचा काळ सुरु आहे. या काळात भाविकांची गर्दी झाली तर फिजिकल डिस्टन्सींगचे पालन करण्यास अडचण निर्माण होऊ शकते. त्यामुळेच यंदाचा गणेशोत्सव सार्वत्रिकरित्या साजरा न करण्याचा निर्णय मंडळाचे अध्यक्ष संदीप पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सर्वसाधारण बैठकीमध्ये घेण्यात आला.
दरम्यान, गेल्या ३० वर्षांपासून या गणेशोत्सवामध्ये माझा सक्रीय सहभाग आहे. त्यामुळे हा गणेशोत्सव माझ्यासाठी अनन्यसाधारण महत्वाचा आहे. मात्र, सध्याच्या महामारीच्या संकटामुळे यंदा गणेशोत्सव सार्वत्रिकरित्या साजरा न करण्याचा निर्णय माझ्यासह नरवीर तानाजी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळासाठी अत्यंत वेदनादायक आहे. मात्र, पुढील वर्षी अधिक उत्साहात आणि थाटामाटात हा उत्सव साजरा करण्यात येणार असल्याचेही डॉ. आव्हाड यांनी सांगितले आहे.
440 total views, 1 views today