भाजपा प्रदेश उपाध्यक्ष अॅड.माधवी नाईक यांचा सवाल
ठाणे : महापालिकेने बाळकूम येथे उभारलेल्या विशेष कोविड रुग्णालयात महिलांवर अत्याचार होण्याची वाट पाहणार का, असा संतप्त सवाल भाजपाच्या नेत्या अॅड.माधवी नाईक व नगरसेविकांनी आज रुग्णालय प्रशासनाला विचारला. तसेच महिला सुरक्षारक्षकांसह तत्काळ विविध उपाययोजना करण्याची मागणी केली.
विशेष कोविड रुग्णालयातील महिलांच्या प्रसाधनगृहाजवळ संशयास्पदरित्या एका कर्मचाऱ्याचे वर्तन आढळले होते. या गंभीर घटनेने संतप्त झालेल्या भाजपाच्या प्रदेश उपाध्यक्षा अॅड.माधवी नाईक यांच्या नेतृत्वाखाली नगरसेविका दिपा गावंड, नंदा पाटील, नम्रता कोळी, स्नेहा आंब्रे, महिला मोर्चाच्या अध्यक्षा हर्षला बुबेरा यांच्यासह महिला कार्यकर्त्यांनी विशेष कोविड रुग्णालयाला भेट दिली. तसेच रुग्णालयाचा कारभार पाहणारे पालिका उपायुक्त विश्वनाथ केळकर यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. या प्रकरणी दोषी कर्मचाऱ्याला अटक करण्याची मागणी महिला नगरसेविकांनी केली.
विशेष कोविड रुग्णालयात दोन मजल्यांवरील महिलांच्या वॉर्डसाठी महिला सुरक्षा रक्षकाची आवश्यकता होती.सीसीटीव्ही बसविले असले, तरी गैरप्रकार घडल्यानंतर कारवाई करणार का, असा सवाल करीत प्रदेश उपाध्यक्ष अॅड.माधवी नाईक यांनी तातडीने महिला सुरक्षा रक्षकांच्या नियुक्तीची मागणी केली. ती उपायुक्त विश्वनाथ केळकर यांनी मान्य केली.
कोविड वॉर्डामध्ये दाखल झालेल्या महिला रुग्णांना धीर देण्याचीही आवश्यकता आहे. मात्र, रुग्णालयात असा प्रकार घडल्याची बाब अत्यंत निषेधार्ह आहे. यापुढे अशी घटना सहन केली जाणार नाही, असा इशाराही अॅड.माधवी नाईक यांच्यासह नगरसेविकांनी दिला. दरम्यान, या प्रकरणातील आरोपीविरोधात कडक कारवाई करावी. त्यातून असे वर्तन करणाऱ्यांवर जरब बसेल, असे आवाहनही अॅड.माधवी नाईक यांनी पोलिसांना केले आहे.
450 total views, 1 views today