अस्मा शेख हिला हक्काचे घर मिळवून देण्याचे आ. सरनाईक यांनी दिले आश्वासन
भाईंदर : मुंबईत आझाद मैदान पोलीस स्टेशन समोरील फुटपाथवर राहून , रस्त्यावरील दिव्यांच्या प्रकाशात अभ्यास करणाऱ्या अस्मा शेखने यंदाच्या शालांत परीक्षेत ४० % गुण मिळवून सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. फुटपाथवर राहणाऱ्या अस्माला मुंबापुरीत हक्काचे घर मिळवून देण्यासाठी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक पुढे आले आहेत. तिला पुढील शैक्षणिक वाटचालीत आवश्यक ते सहकार्य करण्यासह तिला राज्य सरकारकडून हक्काचे घर मिळावे यासाठी प्रयत्न करणार आहोत , त्यासाठी सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचे सरनाईक यांनी सांगितले.
काल दहावीचा निकाल जाहीर झाल्यावर अस्मा शेखने मिळवलेल्या यशाची माहिती मिळवल्यावर आज तिचे अभिनंदन करण्यासाठी आमदार प्रताप सरनाईक यांनी तिला फोन करून तिचे विशेष कौतुक केले. तिच्या पुढील शिक्षणाची जबाबदारी स्वीकारण्याची तयारी प्रताप सरनाईक यांनी दाखवली. पण त्याआधीच युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या युवा सेनेने तिच्या पुढील शिक्षणाची जबाबदारी घेतल्याचे अस्मा हिने सांगितले. त्यावेळी आम्हाला हक्काचे घर मिळावे , अशी अपेक्षा तिने आमदार सरनाईक यांच्याकडे बोलताना व्यक्त केली.
त्यावर आपण राज्याचे मुख्यमंत्री नगरविकास मंत्री तसेच गृह निर्माण मंत्री यांच्याकडे पाठपूरावा करून mmrda किंवा म्हाडा कडून अस्मा शेख हिला हक्काचे घर मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू असे सरनाईक म्हणाले. तसेच कॉलेज करून पार्टटाइम जॉब करायचा असेल तर मुंबईत फोर्ट भागात नोकरी मिळवून देण्याचा शब्द सरनाईक यांनी दिला. त्यावर अस्मा शेख हिनेही कॉलेज करून पार्ट टाइम नोकरी करण्याची तयारी दर्शवली आहे. रस्ता रुंदीकरणात बाधित होणाऱ्या अनेक नागरिकांना mmrda च्या योजनेत घरे देण्यात आली आहेत. त्याचपद्धतीने कठीण परिस्थितीत संघर्ष करून यश मिळविणाऱ्या व सर्वांपुढे आदर्श निर्माण करणाऱ्या अस्मा शेख हिला राज्य सरकारकडून घर मिळवून देण्यासाठी आपण सरकारकडे पाठपुरावा करणार आहोत , असे आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितले.
अस्मा शेखच्या या संघर्षातून सर्व सुखसोयी असतानाही कूरकूर करणा-या विद्यार्थ्यांनी धडा घेण्याची गरज आहे. रस्त्यावर राहणा-या आसमाचे ४० टक्क्यांचे हे यश निश्चितच ९० टक्क्यांहून कमी नाही. तिला मार्क्स किती मिळालेत हे महत्वाचे नाही, पण या परिस्थितीतही शिक्षण घेण्याची जिद्द तिने मनात कायम ठेवली , प्रयत्न केले हे महत्वाचे असून तिला पुढील वाटचालीत आवश्यक ते सहकार्य करू , असे सरनाईक म्हणाले.
रस्त्यावर लिंबू सरबत विकणाऱ्या आपल्या वडिलांना फूटपाथवरून स्वत:च्या घरात न्यायचं तिचं स्वप्न आहे. आणि त्यासाठी नक्कीच आपण प्रयत्न करू असा शब्द सरनाईक यांनी दिला आहे.
510 total views, 2 views today