लोकप्रतिनिधी आणि सरकारी कर्मचाऱ्यांचे राहिलेले थकित वेतन मिळणार

जुलै महिन्याचे वेतन अदा झाल्यानंतर मार्चचे अर्धे वेतन जमा होणार

मुंबई : राज्यातील निवडून आलेले लोकप्रतिनिधी आणि सरकारी अधिकारी- कर्मचाऱ्यांचे मार्च महिन्यातील अर्धे राहिलेले वेतन लवकरच मिळणार आहे. सध्या जुलै महिन्याचे वेतन तयार करण्याचे काम सुरु आहे. ते वेतन कोषागारातून दिले गेल्यानंतर लगेच मार्च महिन्याचे थकित अर्धेवेतन त्यांच्या खात्यावर जमा करण्याचे आदेश वित्त विभागाने सर्व विभागांना दिले असून याबाबतचा शासन निर्णय ही जाहीर करण्यात आला आहे.
कोरोनामुळे मार्च महिन्यात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. त्यामुळे राज्यातील आर्थिक व्यवहार पूर्णत: ठप्प झाल्याने नियोजित महसूल राज्याच्या तिजोरीत जमा होवू शकला नाही. यामुळे राज्य सरकारने मार्च आणि एप्रिल महिन्यात सर्व सरकारी कर्मचारी-अधिकारी आणि निवडूण आलेले लोकप्रतिनिधींना अर्धेच वेतन दिले. मात्र मिशन बिगेन अगेन आणि अनलॉक-१ मुळे हळुहळु आर्थिक गाडी रूळावर येत आहे. त्यातच थकित अर्ध्यावेतनाची रक्कम गणपती पर्यंत देण्याचे आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले होते. त्यानुसार ही कारवाई करण्यात येत आहे.
निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना सद्य परिस्थितीत ६० टक्के वेतन, सरकारी सेवेतील अ आणि ब गटातील सरकारी अधिकाऱ्यांना ५० टक्के तर गट क वर्गातील कर्मचाऱ्यांना २५ याप्रमाणे थकित वेतन देण्याबाबतचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे गणेशोत्सव सुरु होण्यापूर्वी सर्वांना थकित वेतनाची रक्कम मिळणार आहे.

 499 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.