विकास आराखडा आणि त्याची नियमावली याचे गाढे अभ्यासक म्हणून सतीश ओक यांची ख्याती होती
बदलापूर : येथील प्रख्यात वास्तुविशारद, बदलापूर हायस्कुलचे अध्यक्ष सतीश ओक यांचे सोमवार, २७ जुलै रोजी निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ६१ वर्षे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. मुंबई येथील एका खाजगी रुग्णालयात त्यांची सुरु असलेली मृत्यूशी झुंज अखेर अयशस्वी ठरली. कोरोनाने त्यांचा बळी घेतला.
विकास आराखडा आणि त्याची नियमावली याचे गाढे अभ्यासक म्हणून सतीश ओक यांची ख्याती होती. बदलापूर शहराच्या विकासात त्यांचा फार मोठा वाटा आहे. अतिशय हुशार, अभ्यासू आणि तितकेच विनम्र, हसतमुख असे व्यक्तिमत्व म्हणजे सतीश ओक होय. मुंबई येथील जेजे स्कुल ऑफ आर्ट मधून त्यांनी वास्तुविशारद म्हणून पदवी घेतली. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी बदलापूर येथेच अखेरच्या श्वासापर्यंत सेवा केली. अतिशय प्रामाणिक आणि सर्वाना सहकार्य करण्याचा त्यांचा स्वभाव होता. ते स्पष्ट वक्ते होते. अवाजवी फी आकारण्याच्या विरोधात ते होते. बदलापूर शहरातील सरकारी आणि खाजगी इमारतींचे बहुतेक आराखडे हे सतीश ओक यांनीच केले आहेत. बदलापूर पालिकेची होऊ घातलेल्या प्रशासकीय इमारतीचा आराखडाही त्यांनीच केला आहे. नाविन्यपूर्ण इमारती उभारणे, कालानुरूप बदल कायद्यात करवून घेण्यासाठी त्यांची सतत धडपड असे. नवीन निवासी संकुले उभारताना त्यात वर्षा जल संचयन आणि सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करण्यावर त्यांचा भर असे.
सामाजिक बांधिलकी जपणारे सतीश ओक डोंबिवली नागरी सहकारी बँकेचे सहा वर्ष संचालक होते. शहरातील सामाजिक, शैक्षणिक संस्थांशी त्यांचा घनिष्ठ संबंध होता. शैक्षणिक आणि धार्मिक संस्थेच्या नवीन इमारतीसाठी त्यांनी विनामूल्य आराखडे बनवून दिले आहेत. पालिकेच्या इमारतींच्या विकास आराखड्यांचे कामही त्यांनी विनामूल्य किंवा अत्यल्प मानधनावर केले आहे. बदलापूर, अंबरनाथ, मुरबाड, कल्याण, ठाणे, मुंबई आदी शहरातील अनेक इमारतींचा आराखडा त्यांनी तयार केला आहे. खासदार प्रकाश परांजपे यांच्या निधी मधून बदलापूर हायस्कुलची नवीन इमारत उभारण्यात त्यांचा मोलाचा सहभाग होता. बदलापूर हायस्कुलची संपूर्ण इमारत हि खासदार निधी मधून उभारण्यात आली आहे. खासदार निधी मधून उभारण्यात आलेली हि देशातील पहिली शाळा होय. सतीश ओक यांच्या अकाली निधनाने बदलापूर मध्ये शोककळा पसरली आहे.
474 total views, 1 views today