धर्मद्वेष्ट्यांनी कितीही विरोध केला, तरी राममंदिर होणारच ! – स्वामी गोविंददेवगिरी महाराज, कोषाध्यक्ष, श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास

‘राममंदिराच्या निर्माणाला आता विरोध का ?’, या विषयावरील परिसंवादात विविध मान्यवरांचा सहभाग

मुंबई : पूर्वीचे आक्रमक आणि आताची त्यांची पिलावळ राममंदिरालाच नव्हे, तर हिंदु संस्कृती पूर्ण नष्ट करण्याचा अजेंडा ठेवून काम करत आहे. यासाठी अनेक संघटना, पक्ष आणि व्यक्ती कार्यरत आहेत. राममंदिराच्या निर्माणामुळे हिंदूंच्या शक्तीचे जागरण होणार आहे. त्यामुळे या शक्तींचा विरोध वाढत आहे; मात्र या धर्मद्वेष्ट्यांनी कितीही विरोध केला, तरी भव्य राममंदिराचे निर्माण होणारच, असे ठाम प्रतिपादन श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष  स्वामी गोविंददेवगिरीजी महाराज यांनी केले. ते हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘चर्चा हिन्दू राष्ट्र की’ या ‘ऑनलाईन’ परिसंवाद मालिकेत ‘राममंदिराच्या निर्माणाला आता विरोध का ?’, या विषयावरील ‘विशेष संवादा’त बोलत होते. या परिसंवादामध्ये अयोध्या संत समितीचे महंत पवनकुमार दास शास्त्री, हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक डॉ. चारुदत्त पिंगळे, ‘हिन्दू फ्रंट फॉर जस्टिस’ चे प्रवक्ता अधिवक्ता विष्णु शंकर जैन आणि हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते  रमेश शिंदे हेही सहभागी झाले होते. हिंदु जनजागृती समिती सतीश कोचरेकर आणि सुमित सागवेकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. हा कार्यक्रम फेसबुक आणि यू-ट्यूब यांच्या माध्यमांतून ६८४७९ लोकांनी प्रत्यक्ष पाहिला, तर २,९५९३० लोकांपर्यंत हा कार्यक्रम पोहोचला.

राममंदिरासह अयोध्येतील विद्ध्वंस झालेल्या 360 मंदिरांचाही पुनरोद्धार करा – महंत पवनकुमार दास शास्त्री

केवळ राममंदिरच नव्हे, तर अयोध्येतील लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न यांच्यासह एकूण ३६० मंदिरांचाही आक्रमकांनी विद्ध्वंस करून त्यावर मशिदी आणि कब्रस्ताने बांधली आहेत. या प्राचीन मंदिरांचे मोगलीकरण करण्याचा प्रकार न्यायालयातही मांडण्यात आला आहे. यासाठी आम्ही साधू-संत सतत संघर्ष करत आहोत. तरी केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांनी राममंदिरासह अयोध्येतील विद्ध्वंस झालेल्या सर्व ३६० मंदिरांचेही पुनर्निर्माण करावे, अशी समस्त हिंदूंची अपेक्षा असल्याचे अयोध्या संत समितीचे महंत पवनकुमार दास शास्त्री यांनी या वेळी सांगितले.
हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक डॉ. चारुदत्त पिंगळे या वेळी म्हणाले की, रामाचे संपूर्ण जीवनच संघर्षमय आहे. त्यामुळे राममंदिराची उभारणी आणि रामराज्याची स्थापना यांसाठी आपल्यालाही संघर्ष करावा लागेल. हिंदूंचा ५०० वर्षांचा वनवास संपून राममंदिराची निर्मिती होत आहे. यामुळे राष्ट्राची आध्यात्मिक चेतना वाढेल. मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामाच्या आशीर्वादाने हे कार्य चालू आहे. यातूनच पुढे रामराज्याला म्हणजेच धर्मकार्याला आरंभ होईल. सर्वोच्च न्यायालयाचे अधिवक्ता विष्णु जैन या वेळी म्हणाले, ‘मुंबईमध्ये कोरोनात पाळावयाच्या नियमांची मोठ्या प्रमाणावर पायमल्ली होत असतांना त्याविषयी याचिका न करता मुंबईतील साकेत गोखले यांनी अयोध्येतील राममंदिराच्या भूमीपूजनाच्या विरोधात याचिका का प्रविष्ट केली ? त्यांची याचिका न्यायालयाने फेटाळल्यानंतर त्याच्या घराजवळ ‘जय श्रीराम’ अशा घोषणा दिल्या गेल्यावर महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी एक घंट्यामध्ये मोठी पोलीस सुरक्षा पुरवली. हा सर्व प्रकार पहाता यामागे ठराविक राजकीय पक्षांचा उघड हात असल्याचे स्पष्ट होते.’ या वेळी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने राममंदिरासह मशीद बांधण्यालाही अनुमती दिली; मात्र कुणीही मशिदीला विरोध केला नाही. राममंदिराचा प्रश्‍न आला की, ती ‘बुद्धभूमी आहे’, ‘तेथे अनेकांच्या हत्या झाल्याने ते कब्रस्तान आहे’ आणि आता कोरोनाचे कारण देऊन विरोध केला जात आहे. कोरोना असतांना दारूची दुकाने उघडली, त्या विरोधात कुणी याचिका केली नाही. श्रीजगन्नाथ पुरीच्या यात्रेलाही असाच आक्षेप घेतला गेला. भूमीपूजनाला होणारा विरोध जनहितासाठी किंवा कोरोनाच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी नसून राममंदिराला आहे, हे हिंदूंनी लक्षात घेतले पाहीजे.

 423 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.