अति दक्षता विभागासाठी खाजगीकरणातून तज्ज्ञ डॉक्टर्स नेमणार


अंबरनाथ पालिकेचा निर्णय

अंबरनाथ : जून महिन्यात कोविड काळजी केंद्र सुरू करून शहरातील सौम्य स्वरूपाची लक्षणे असणाऱ्या करोना रुग्णांना उपचार उपलब्ध करून देणाऱ्या अंबरनाथ पालिकेने आता अति दक्षता विभागही कार्यान्वीत करण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी आवश्यक असणाऱ्या तज्ज्ञ डॉक्टरांची खाजगीकरणातून नेमणूक करण्यात येणार आहे. 
पालिकेने चिखलोली येथील दंत महाविद्याालयात करोना काळजी केंद्र उभारले आहे. शहरातील खाजगी डॉक्टरांनी स्वयंस्फूर्तीने सेवा दिल्याने, तसेच मुंबई-पुण्यातील तरुण डॉक्टरांच्या नेमणुकीमुळे हे रुग्णालय उत्तमरित्या सुरू आहे. अंबरनाथमध्ये शनिवारपर्यंत ३४५१ करोना रुग्ण आढळून आले. त्यापैकी २८१४ रुग्ण बरे झाले. ५०३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. सव्वा महिन्यापूर्वी कार्यान्वीत झालेल्या शहरातील करोना काळजी केंद्रात शनिवारपर्यंत १५२० रुग्ण उपचारांसाठी दाखल झाले, त्यापैकी १३०३ जण बरे होऊन घरी परतले. शनिवारी या रुग्णालयात एकुण २०३ रुग्ण उपचारांसाठी दाखल होते. तसेच या रुग्णालयात उपचार घेत असताना तीन रुग्ण दगावले. या रुग्णालयात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सर्वाधिक म्हणजे ८५ टक्के इतके आहे.
अंबरनाथ शहरात एकुणच रुग्ण बरे होण्याचे प्रमाण जिल्ह्यात उत्तम असले तरी लोकसंख्येच्या तुलनेत करोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्या रुग्णांची संख्या मात्र अधिक आहे. शनिवारपर्यंत शहरात एकुण १३४ जणांचा मृत्यू झाला होता. मृत्यूचे हे प्रमाण ३.८८ टक्के इतके आहे. कारण शहरात अत्यवस्थ रुग्णांवर उपचार करण्यासाठी व्हेंटिलेटर्सची सोय असणारा अति दक्षता विभाग नाही. त्यामुळे एकीकडे बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ऐशी टक्क््यांहून अधिक आणि मृत्यूचे प्रमाण मात्र जास्त अशी परस्पर विरोधी परिस्थिती आहे.

तज्ज्ञ डॉक्टरांचे आऊट सोर्सिंग
शहराच्या आरोग्य व्यवस्थेत मुख्य उणीव असलेला अति दक्षता विभाग उभारण्यासाठी पालिका प्रशासन आता प्रयत्न करीत आहे. त्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांंचे आऊट सोर्सिंग करून त्यांच्या मदतीने कोविड काळजी केंद्रात अतिदक्षता विभाग सुरू केला जाणार आहे. त्यादृष्टीने अशा सेवा पुरविणाऱ्या निविदाही मागविण्यात आल्या असल्याची माहिती पालिकेचे मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ यांनी दिली. या डॉक्टरांच्या माध्यमातून कोविड रुग्णालयात आरोग्य सेवा दिली जाईल. त्यासाठी लागणारे साहित्य, पायाभूत सुविधा पालिका प्रशासन उपलब्ध करून देणार आहे. कोविड रुग्णालयात लवकरच ५०० खाटांची सोय केली जाणार आहे. त्यातील ३०० खाटा सौम्य लक्षणे असणाºया रुग्णांसाठी तर २०० खाटा अत्यवस्थ रुग्णांसाठी असतील. त्या २०० खाटांपैकी ४० खाटांचा अति दक्षता विभाग असेल, असेही प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.

 420 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.