ना संकल्प ! ना दक्षिणा !


पुरोहित वर्गाची उपासमार

  अंबरनाथ : एप्रिल, मे, जून, जुलै असे सर्व महिने कोरोनाच्या या टाळेबंदीत गेले. त्यामुळे ना शुभ मंगल सावधान, ना कोणत्याही पूजेचा संकल्प. परिणामी दक्षिणा नाही. आता श्रावण आणि भाद्रपदातील हुकुमी सत्यनारायण पूजा, रुद्राभिषेक, गणपती स्थापना आदी सर्व पूजा अर्चा बंद झाल्याने पूर्ण वेळ भिक्षुकी करणाऱ्या पुरोहित वर्गावर उपासमारीची वेळ आली आहे. बरं हा सर्वसाधारण मध्यमवर्गीय. त्यामुळे कोणतीही तक्रार कोणाकडे करणार नाही कि कोणाकडे काही मागणारही नाही. केवळ भिक्षुकीवर गुजराण करणाऱ्या या पुरोहितांच्या कुटुंबाची अवस्था काय झाली असेल याची कल्पनाही करवत नाही. घरातील धान्य, मुलांच्या शाळा शिक्षण, अन्य कामासाठी घेतलेल्या कर्जाचे हप्ते सर्व काही थकलेले.   
  श्रावणातील व्रत वैकल्य आणि पूजांवरही कोरोना संकटाचे सावट असून घरोघरी होणारी धार्मिक कार्ये संचारबंदीमुळे रद्द करण्यात आली आहेत. त्यामुळे या काळात दक्षिणेच्या रूपाने मिळणाऱ्या हुकमी उत्पन्नाला पुरोहित वर्ग मुकला आहे. मार्च महिन्यापासून ठाण मांडून असलेल्या कोरोना संकटामुळे लग्नसराईतील कामे गेली. किमान आता श्रावण आणि येणाऱ्या गणेशोत्सवात काही प्रमाणात का होईना धार्मिक कामे मिळतील, अशी पुरोहित वर्गाला अपेक्षा होती. मात्र कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी श्रावणात होणारी ‘पूजा' न करण्याचा निर्णय बहुतेक नागरिकांनी घेतल्यामुळे पुरोहित वर्ग अडचणीत आला आहे. थोडक्यात यंदा कोरोनामुळे घरोघरी सत्य नारायणाच्या पोथीतील साधू वाण्याची कथा सांगितली अथवा ऐकली जाणार नाही हे मात्र निश्चित.
      शहरामध्ये पुरोहित मंडळी पूर्णवेळ आणि अर्धवेळ स्वरूपात पौरोहित्य करतात. त्यातील अर्धवेळ  काम करणाऱ्यांचे फारसे नुकसान झालेले नाही. कारण त्यांच्याकडे नोकरी, व्यवसायाचे असे हमखास उत्पन्नाचे पर्यायी साधन आहे. मात्र पूर्णपणे पौरोहित्य करणारा वर्ग मात्र आर्थिक संकटात सापडला आहे.

साधारण एप्रिल-मे पासून लग्न सराई सुरू होते. लग्न मुंज, त्यानिमित्ताने सत्यनारायण पूजा अशी नित्यनैमित्यिक कामे सुरु असतात. पुढे श्रावण, गणेशोत्सव आणि नवरात्रात पुरोहितांना कामे मिळतात. श्रावणात घरोघरी रूद्र, सत्य नारायण आदी धार्मिक कार्ये होतात. अनेकांचा श्रावणातील दिवस आणि पूजा सांगणारे पुरोहित वर्षानुवर्षे ठरलेले असतात. या व्यतिरिक्त ऐनवेळीही पुरोहितांकडे पुजेसाठी विचारणा होत असते. श्रावणी सोमवार, शनिवार, रविवारी अधिक प्रमाणात पूजा होतात. त्यामुळे पुरोहितांना एकाच दिवसात चार चार पूजा सांगाव्या लागतात. त्यातून अर्थातच दक्षिणेच्या रूपाने त्यांच्याकडे पैसे येतात. यंदा नवीन पूजेची आमंत्रणे सोडा, नेहमीच्या यजमानांकडूनही आमंत्रण आलेले नाही, कि विचारणाही झालेली नाही.
पौरोहित्याशिवाय उत्पन्नाचे कोणतेही साधन नाही. गेली चार महिने सर्व प्रकारची मंगल आणि धार्मिक कार्ये बंद आहेत. श्रावण महिन्यात अपेक्षा होती. मात्र अजून तरी एकाही यजमानांकडून बोलावणे आलेले नाही अशी प्रतिक्रिया गजानन गोविंद कर्वे, यांनी व्यक्त केली आहे.
पूर्णवेळ पौरोहित्य करणाऱ्या आम्हा मंडळींना दर महिन्याकाठी सारखेच उत्पन्न मिळत नाही. श्रावण महिन्यात आमच्यापैकी बहुतेकांकडे सरासरी दिवसाला एक म्हणजे महिन्याभरात ३०/३५ पूजा असतात. पुढे गणपतीत चांगली कमाई होते. यंदा हे सारे कठीण आहे. श्रावणात काम नाही, असे यापूर्वी कधीही घडले नव्हते असे तरुण पिढीतील पुरोहित मंगेश सटवे यांनी सांगितले.
काही पुरोहितांनी ऑन लाईन पूजा करता येईल का असे विचारले होते. ऑन लाईन पूजा सांगताना आपण काय सांगतो आणि यजमान काय करतात हे कळू शकत नाही. त्यामुळे पूजा सांगून पुरोहिताच्या आणि यजमानांच्या मनाचे समाधान होणार नाही. त्यापेक्षा यजमानांकडे पूजा सांगताना सुरक्षित अंतर राखून पूजा करता येणे शक्य आहे. पूजा झाल्यावर ज्यांना दर्शन आणि तीर्थ प्रसादाला बोलावयाचे आहे त्यांना वेळ निश्चित ठरवून सुरक्षित अंतर राखून बोलावता येऊ शकते. त्यामुळे कोणताही धोका उदभवणार नाही आणि आपली मंगल कार्ये श्रद्धेने पार पडतील असे पेंडसे गुरुजींनी सांगितले.

 544 total views,  2 views today

Leave a Reply

Your email address will not be published.