दाखल्यासाठी विद्यार्थी-पालकांची होतीयं दमछाक
८० टक्के महा ईसेवा केंद्र बंद, पालकांना प्रवेशाची चिंता.
ठाणे : दहावी आणि बारावीच्या निकालानंतर आता सर्वांनाच प्रवेशाची चिंता लागली असताना करोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या चार महिन्यांपासून ठाण्यातील मध्यवर्ती सेतू केंद्र बंद स्तिथीत आहे. त्यामुळे उत्पन्नाचा दाखला असो किंवा प्रवेशसाठी लागणाऱ्या कागदपत्रांसाठी विद्यार्थी पालक सेतू केंद्राचे हेलपाटे मारत आहेत. पण करोना आणि स्टाफ कमी असल्यामुळे अद्यापही सेतु केंद्राची सेवा सुरू न झाल्याने याचा फायदा मात्र एजंट घेत असल्याचे चित्र समोर आले आहे. ऑनलाइन ही सेवा सुरू असल्याचे प्रशासन सांगत असलं तरीही तांत्रिक अडचणी तसेच कोणतेही मार्गदर्शन मिळत नसल्यामुळे विद्यार्थ्यांची चिंता वाढत आहे. प्रशासनाने लवकरात लवकर सेतु केंद्र सुरू करण्याची मागणी मनसेच्या स्वप्नील महिंद्रकर यांच्या वतीने करण्यात आली आहे.
महाविद्यालयातील वेगवेगळ्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेताना उत्पन्नाचा दाखला, रहिवाशी दाखला, अधिवास दाखला आवश्यक असतो. या कागदपत्रांशिवाय महाविद्यालयात प्रवेश दिला जात नाही. त्यात ठाण्यातील सेतू केंद्र बंद असल्यामुळे पालक आणि विद्यार्थी हताश झाले आहेत. सरकारने लॉकडाउनचे नियम क्षिथिल करत कार्यालय सुरू करण्याच्या सुचना केल्या. पण अद्यापही ठाण्यातील सेतू कार्यालय बंद असल्याचे फलक दिसून येत आहे. या कार्यालय परिसरात दिलेल्या वेबसाईटवर अर्ज करण्याची सूचना केली असली तरी त्या वेबसाईटमध्येही तांत्रिक अडचणी निर्माण होतं असल्यामुळे ऑनलाइन दाखल्यासाठी विद्यार्थी अर्ज करू शकत नसल्याची परिस्थिती आहे. तर या कार्यालयाच्या बाहेर अनेक एजंटांचा सुळसुळाट असून या बंद कार्यालयाचा फायदा घेत अधिक रक्कम घेऊन दाखले काढले जात असल्याची माहिती पुढे आली आहे. दरम्यान करोनामुळे सेतु केंद्र बंद असून पुरेसा स्टाफ नसल्याने हे कार्यालय बंद असल्याचे येथील तहसिलदार यांनी सांगितले. तर हे कार्यालय सुरू करण्याबाबत पुढच्या महिन्यात बैठक होणार असून त्यानंतर निर्णय होणार असल्याचीही माहिती पुढे आली आहे.
शहरातील बहुतेक महाईसेवा केंद्रही बंद असल्यामुळे पालक व विद्यार्थ्यांची कुचंबणा होत आहे. आधीच लॉकडाउनमुळे अनेकांची परिस्थिती बिकट असताना प्रशासन मात्र सहकार्याची भूमीका घेत नसल्याचे दिसून येत आहे. विद्यार्थी व पालकांचा त्रास कमी करत सेतु सेवा पूर्ववत सुरू करावी, तसेच प्रशासनाने एका व्यक्तीची नेमणूक करून ऑनलाइन दाखले कसे काढावेत त्याची प्रक्रिया सजून सांगणारी यंत्रणा उभी करण्याची मागणी मनसेचे स्वप्निल महिंद्रकर यांनी केली आहे.
559 total views, 1 views today