महास्वयंम आणि ऑनलाईन मेळाव्यातून १७ हजार ७१५ बेरोजगारांना रोजगार

१ लाख ७२ हजार बेरोजगारांची नोंदणी : कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांची माहिती

मुंबई : कोरोनाच्या संकटामुळे बेरोजगारीचीही समस्या निर्माण झाली. पण असे असतानाही मागील ३ महिन्यात कौशल्य विकास विभागाने जिल्ह्याजिल्ह्यांमध्ये आयोजित केलेले ऑनलाईन रोजगार मेळावे आणि महास्वयंम वेबपोर्टलमार्फत तब्बल १७ हजार ७१५ बेरोजगारांना रोजगार मिळवून दिला. मागील ३ महिन्यात कौशल्य विकास विभागाच्या विविध व्यासपीठांवर १ लाख ७२ हजार १६५ बेरोजगारांनी रोजगारासाठी नोंदणी केली असून या सर्व उमेदवारांना नोकरी मिळवून देण्यासाठी विभाग प्रयत्न करीत असल्याची माहिती राज्याचे कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांनी दिली.
बेरोजगार उमेदवार आणि उद्योजक यांच्यामध्ये सांगड घालण्यासाठी कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाने https://rojgar.mahaswayam.gov.in हे वेबपोर्टल सुरू केले आहे. या वेबपोर्टलवर बेरोजगार उमेदवार आपले शिक्षण, कौशल्ये, अनुभव आदी माहीतींसह नोंदणी करतात. त्याचबरोबर कुशल उमेदवारांच्या शोधात असलेल्या कंपन्या, उद्योजक, कॉर्पोरेट्स हे सुद्धा या वेबपोर्टलवर नोंदणी करुन त्यांना हवे असलेले कुशल उमेदवार शोधू शकतात. अशाप्रकारे बेरोजगार आणि उद्योजक यांच्यामध्ये समन्वय घडवून आणण्याचे काम या वेबपोर्टलमार्फत करण्यात येत असल्याचे ते म्हणाले.
मागील ३ महिन्यात एप्रिल ते जूनअखेर या वेबपोर्टलवर १ लाख ७२ हजार १६५ इतक्या नोकरी इच्छूक उमेदवारांनी नवीन नोंदणी किंवा पुनर्नोंदणी केली. यामध्ये मुंबई विभागात २४ हजार ५२०, नाशिक विभागात ३० हजार १४५, पुणे विभागात ३७ हजार ५६२, औरंगाबाद विभागात ३५ हजार २४३, अमरावती विभागात १४ हजार २६० तर नागपूर विभागात ३० हजार ४३५ इतक्या नोकरीइच्छूक उमेदवारांनी नोंदणी केली आहे. यापैकी १७ हजार १३३ उमेदवारांना नोकरी मिळविण्यात यश आले असून यात मुंबई विभागातील ३ हजार ७२०, नाशिक विभागातील ४८२, पुणे विभागातील १० हजार ३१७, औरंगाबाद विभागातील १ हजार ५६९, अमरावती विभागातील १ हजार ०२२ तर नागपूर विभागातील २३ उमेदवारांचा सहभाग आहे. याशिवाय महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीने त्यांच्या उपक्रमातून ५८२ उमेदवारांना रोजगार मिळवून दिला.

ऑनलाईन मेळाव्यात ४० हजार नोकरीइच्छूक सहभागी

कौशल्य विकास विभागाने मागील तीन महिन्यात राज्यभरात पंडित दीनदयाळ उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्यांची मोठी मोहीम सुरू केली. प्रत्येक जिल्हास्तरावर ऑनलाईन रोजगार मेळावे घेण्यात येत आहेत. मागील ३ महिन्यात २४ ऑनलाईन रोजगार मेळावे संपन्न झाले असून उर्वरित जिल्ह्यांमध्ये लवकरच मेळावे होणार आहेत. झालेल्या मेळाव्यांमध्ये १६७ उद्योजकांनी सहभाग घेतला. त्यांच्याकडील १६ हजार ११७ जागांसाठी त्यांनी ऑनलाईन मुलाखती घेतल्या. या मेळाव्यांमध्ये ४० हजार २२९ नोकरीइच्छूक तरुणांनी सहभाग घेतला. त्यापैकी आतापर्यंत २ हजार १४० तरुणांना रोजगार मिळाला आहे. उर्वरित जागांसाठी उर्वरित तरुणांमधून निवड प्रक्रिया सुरू असल्याचे ते म्हणाले.

नोकरीइच्छूक तरुणांनी नोंदणी करण्याचे आवाहन

यापुढील काळातही रोजगार उपलब्धतेसाठी विभागामार्फत मोहीम पातळीवर काम केले जाईल. नोकरी इच्छूक तरुणांनी https://rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर नोंदणी करावी. आधी नोंदणी केलेल्या उमेदवारांनी आपली माहिती अद्ययावत करावी, तसेच कुशल उमेदवारांच्या शोधात असलेले उद्योजक, कॉर्पोरेट्स यांनीही या वेबपोर्टलवर नोंदणी करावी, असे आवाहन त्यांनी केले.

 433 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.