आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश
अंबरनाथ : पश्चिमेतील वडोलगावमधील रहिवाशांच्या राहत्या घरांच्या जागा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने अखेरीस वगळल्या असल्याचे उद्योग विभागाने प्रसिद्ध केलेल्या राजपत्रात नमूद केले. हे प्रकरण सरकार दरबारी लावून धरून नागरिकांच्या राहत्या घराच्या जागा वगळण्याकरिता सातत्याने पाठपुरावा करणारे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी आनंद व्यक्त केला असून हा वडोलगावातील रहिवाशांचा विजय असल्याचे आमदार डॉ. बालाजी किणीकर म्हणाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उद्योग मंत्री सुभाष देसाई, ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी आभार मानले आहेत.
पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाने व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या सहकार्याने वडोल गाववासीयांना न्याय मिळाला, असल्याची भावना डॉ. किणीकर यांनी यावेळी व्यक्त केली. एम.आय.डी.सी.ने वडोलगावातील राहत्या घरांची जागा वगळल्याने अखेरीस येथील नागरिकांना न्याय मिळाला आहे.
अंबरनाथ पश्चिम येथील वडोलगाव डी. डी. स्कीम १५ पैकी सिटी सर्वे नं.४००३, मधील सीट नं.१८ आणि २५ मधील जागेवर रहिवाशी गेल्या ८० वर्षांपासून म्हणजेच औद्योगिक विकास महामंडळाच्या स्थापनेच्या अगोदर पासून वास्तव्यास आहेत. या सर्वे नंबरच्या सातबारा उताऱ्यावर इतर अधिकारात सन-१९३५ पासून वडोलगावातील घरांची नोंद असून गावची जागा व घरे सोडून बाकी जमिनीचा ताबा महामंडळाला दिला असल्याबाबतचा उल्लेख आहे. असे असताना ही महामंडळ गावची जागा वगळत नसल्याने आमदार डॉ. बालाजी किणीकर शासन दरबारी गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा करीत होते. या रहिवाशांना न्याय मिळवून देण्यासाठी आमदार डॉ. किणीकर यांनी विधिमंडळाच्या अधिवेशनात देखील विविध पध्दतीने हा मुद्दा सभागृहाच्या समोर मांडला होता. तसेच तत्कालीन उद्योग मंत्री व उद्योग राज्यमंत्री यांच्या दालनात बैठका घेण्यात आल्या होत्या.
या सर्व प्रयत्नांना अखेर यश मिळाले असून महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने अलीकडेच हि जागा वगळण्यात येत असल्याचे आदेश काढले आहेत.
439 total views, 1 views today