रुग्णांना योग्य उपचार मिळण्यास प्राधान्य द्यावे- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
कल्याण : कल्याण येथील कोविडसाठी आवश्यक असणाऱ्या स्वॅब चाचणी प्रयोगशाळा आणि कल्याण तसेच डोंबिवली येथील समर्पित कोविड काळजी केंद्रांचे ऑनलाईन उदघाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले.
यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी विशेषतः मुंबई महानगर क्षेत्र परिसरात कोविडचा वाढता प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. कोरोना संकटात महाराष्ट्र शासन खंबिर आहे. आरोग्याच्या सर्व सुविधा जनतेला उपलब्ध करून देण्यासाठी शासन कटीबद्ध आहे. वाढती रुग्णसंख्या रोखण्यासाठी तसेच व्हायरस प्रसाराला अटकाव करण्यासाठी एकत्रित दर्जेदार सुविधा निर्माण करण्याबरोबरच मोठ्या प्रमाणावर ट्रेसिंग करण्यावर भर देण्यात यावा अशा सुचना त्यांनी दिल्या. केवळ मोठमोठया सुविधा उभारून चालणार नाही तर योग्य पद्धतीने रुग्ण सेवा, वैद्यकीय उपचार, पुरेशी ऑक्सिजन व्यवस्थ तात्काळ उपलब्ध होणे गरजेचे आहे यावर भर देण्यास सांगितले.
कोरोना बाधितांवर उपचारासाठी काही ठिकाणी आरोग्य सुविधांची तात्पुरत्या स्वरूपात उभारणी करण्यात आली असून येणाऱ्या काळात या सुविधा कायम स्वरूपी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. आरोग्य सुविधा आणि साथीचे प्रमाण व्यस्त आहे. प्रभावी औषधे हातात येईपर्यंत आपल्याला अधिक सजग असणे आवश्यक आहे. गलथानपणा, ढिलाई आपल्याला पडवणारी नाही. आपल्या उपचारांची गाईडलाईन तपासुन घेणे आवश्यक आहे. राज्याच्या टास्कफोर्स कडून संबंधित यंत्रणेला मार्गदर्शन उपलब्ध करुन देण्यात येईल.
डोंबिवली पूर्व येथील दावडी गावात कच्छी कडवा पाटीदार समाज, मुंबई यांनी पाटीदार भवनाची प्रशस्त जागा महापालिकेस उपलब्ध करुन दिली असून सदर इमारत ही तळ + ४ मजल्याची आहे. पहिल्या मजल्यावरील सुमारे ५००० स्क्वे.फीट च्या प्रशस्त जागेत ७० बेड त्यापैकी ६० ऑक्सिजन सुविधा असलेले व १० सेमी आयसीयू बेड असणार असून दुस-या मजल्यावर काम करणारे डॉक्टरर्स, त्यांचा रहिवास, रेस्ट रुम, त्यांचे कार्यालय असणार आहे. तिस-यामजल्यावरती ५००० स्के.फीट च्या प्रशस्त जागेत ऑक्सिजन सुविधा असलेले ७० बेड व ४ थ्या मजल्यावर देखील ऑक्सिजन सुविधा असलेले ७० बेड रुग्णांकरीता उपलब्ध असणार आहेत. बेसमेंटमध्ये कँन्टींग सुविधा उपलब्ध असून सीसीटीव्ही कॅमेरे व रुग्णांकरीता उदवाहन देखील पाटीदार समाजाने पुरविले आहे.
सदर रुग्णालयात रुग्णांसाठी पंखे, वायफाय सिस्टिम तसेच रुग्णांचे तणाव रहीत वातावरणात राहण्यासाठी मंद सुरावटीची व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे. सदर रुग्णालयात १ रुपी क्लिनीक डॉ. राहुल घुले यांचेमार्फत चालविण्यात येणार असून एकुण २ एमडी फिजीशियन, २५ निवासी डॉक्टर ,५०परिचारिका व ३० हाऊसकिपींगचा स्टाफ रुग्णांचा सेवेसाठी तैनात राहणार आहे.
कल्याण डोंबिवली परिसरात रूग्णांचे वाढते प्रमाण पाहता कॉन्टक्ट ट्रेसिंगचे प्रमाण मोठया प्रमाणावर वाढले आहे. परंतू दिलासा दायक गोष्ट म्हणजे महापालिका व लोकप्रतिनिधी मिळुन काम करीत आहेत. महापालिकांना आर्थिक मर्यादा आहेत, पण मुख्यमंञी यांच्या मार्गदर्शना नुसार आवश्यक त्या सुविधा उपलब्ध होत आहेत, असे पालकमंञी एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले. कोरोना साथीवर प्रतिबंध करण्यासाठी महापालिका करित असलेल्या उपाययोजनांची माहिती पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी यावेळी उपस्थितांना दिली.
याप्रसंगी खासदार श्रीकांत शिंदे, आमदार विश्वनाथ भोईर, प्रमोद पाटील, रविंद्र चव्हाण, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, परीवहन सभापती मनोज चौधरी इतर नगरसेवक व महापालिका अधिकारी वर्ग उपस्थित होता.
483 total views, 2 views today