अवाजवी बिल आकारणाऱ्या कोविड रुग्णालयाला पालिकेचा दणका


रुग्णाकडून वाढीव बिल घेणाऱ्या होरायझन प्राईम हॉस्पिटलची आयुक्तांनी केली मान्यता रद्द

ठाणे : कोविड रूग्णांकडून अवाजवी बिलं आकारली जात असल्यामुळे होरायझन प्राईम रूग्णालयाची कोविड रूग्णालय म्हणून असलेली मान्यता रद्द करण्यात आली आहे. घोडबंदर रोडवरील होरायझन प्राईम हे रूग्णालय २ एप्रिलपासून कोविड रूग्णालय म्हणून घोषित करण्यात आले होते. या रूग्णालयात रूग्णांकडून गैरवाजवी बिलं आकारली जात असल्याच्या तक्रारी ठाणे महापालिकेकडे प्राप्त झाल्यानं पालिका आयुक्तांच्या आदेशावरून ही धडक कारवाई करण्यात आली. महापालिकेच्या लेखा परिक्षण पथकामार्फत बिलांबाबत चौकशी करण्यात आली. या चौकशीत रूग्णालयाकडून एकूण ७९७ रूग्णांवर उपचार करण्यात आले असून ५६ देयके ही गैरवाजवी दराने आकारण्यात आल्याचं विशेष लेखा परिक्षण पथकाच्या निदर्शनास आले असून ५६ देयकातील एकूण आक्षेपाधीन रक्कम ६ लाख ८ हजार ९०० रूपये आहे. त्यानुसार रूग्णालयाला नोटीस बजावून दोन दिवसाच्या आत लेखी खुलासा करण्याबाबत सांगण्यात आले होते. परंतु नोटीसीची मुदत संपल्यानंतरही रूग्णालय व्यवस्थापनाकडून कोणताही लेखी खुलासा न आल्याने ही मान्यता रद्द करण्यात आली आहे. ही मान्यता एक महिन्यासाठी निलंबित करण्यात आली आहे. तसंच समाधानकारक औषधोपचार आणि सर्व रूग्ण डिस्चार्ज होईपर्यंत पालिकेच्या वतीनं या रूग्णालयात द्विसदस्यीय पथक पूर्णवेळ तैनात करण्यात आले आहे.

 487 total views,  2 views today

Leave a Reply

Your email address will not be published.