आजोबा व माहुलीला “ब” वर्ग पर्यटन स्थळांचा दर्जा द्या

माजी आमदार पांडुरंग बरोरा यांची मागणी

शहापूर : शहापूर तालुक्यातील ऐतिहासिक महत्त्व असलेल्या व माता जिजाऊंच्या वास्तव्याने गर्भसंस्कार भूमी म्हणून प्रसिद्ध झालेला माहुली किल्ला तसेच रामायणकार महर्षी वाल्मिक ऋषी यांचे समाधीस्थळ व लव-कुश यांचा पाळणा असलेल्या आजोबा पर्वत या दोन्ही पवित्र स्थळांना शासनाने “ब” वर्ग पर्यटन स्थळाचा दर्जा द्यावा अशी मागणी शहापूरचे माजी आमदार पांडुरंग बरोरा यांनी पर्यटन व पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
शहापूर तालुक्यातील ऐतिहासिक माहुली किल्ल्यावर राजमाता जिजाऊ माँ साहेब आपल्या गरोदरपणाच्या काळात काही दिवस वास्तव्यास होत्या.
छत्रपती शिवाजी महाराजांची सुद्धा मोहिमे दरम्यान या ठिकाणी ये जा सुरू असायची. नाशिक व सुरत परिसराशी माहुलीचा अगदी जवळून संबंध होता.माहुलीवरून जव्हार मार्गे सुरत तर माहूलीवरून नाशिक आणि माहुली ते किन्हवली-मुरबाड तालुक्यातील कासगाव, टोकावडे मार्गे नाणेघाट ओलांडून जुन्नर तसेच अहमदनगर अशी घोडदौड असायची.या मुळे माहुलीला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. या ठिकाणी गिर्यारोहक सुद्धा मोठ्या प्रमाणात येत असतात. माहुली गडावरील धबधबे पर्यटकांना साद घालत असतात.इतिहासाच्या अनेक पाऊलखुणा व घनदाट वनसंपदा असलेल्या या किल्याला अनेक शिवभक्त भेट देत असतात.
शहापुर तालुक्यातील डोळखांब परिसरात असलेल्या आजोबा पर्वतावर सीतामाईचे पुत्र लव-कुश यांचा पाळणा असून आजोबा आश्रम परिसरात रामयणकार महर्षी वाल्मिक ऋषी यांची समाधी आहे. या ठिकाणी असलेल्या मठाद्वारे सतत हरिनाम सप्ताह,कीर्तने, प्रवचने असे अध्यात्मिक कार्यक्रम होत असतात. दुर्मिळ वनौषधीने नटलेल्या जंगलात अनेक प्रकारचे पशु पक्षी यांचे वास्तव सुद्धा या ठिकाणी आहे.अनेक दुर्मिळ वनस्पतींवर संशोधन करण्यासाठी अनेक संशोधक या ठिकाणी एग असतात. महाशिवरात्रीचा महोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो,हजारो भक्त या वेळी येतात.
या दोन्ही स्थळांना भेट देण्यासाठी आलेल्या शिवभक्त व भाविकांना मूलभूत सुविधा देण्यासाठी विकासकामे होणे गरजेचे असून या स्थळांना “ब” वर्ग दर्जाचे पर्यटन स्थळ घोषित करावे अशी मागणी शहापूरचे माजी आमदार पांडुरंग बरोरा यांनी पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांना लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
शासनाने या बाबतचा अहवाल ठाणे जिल्हाधीकार्यांना सादर करण्यासाठी सुचविले असल्याची माजी आमदार पांडुरंग बरोरा यांनी दिली.

 496 total views,  3 views today

Leave a Reply

Your email address will not be published.